नागपूरमधील पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा; पत्नी तक्रार देण्यासाठी अली आणि पोलिस शिपायावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:56 IST2026-02-14T15:47:23+5:302026-02-14T15:56:59+5:30
Nagpur : शहरातील लकडगंज पोलीस ठाणे येथे शुक्रवारी धक्कादायक प्रकार घडला. पोलिस शिपाई किरण विश्वनाथ कुकलरे (वय २८) याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व सहकाऱ्यांशी गैरवर्तन करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

High voltage drama at Nagpur police station; Case registered against Ali and police constable for filing wife's complaint
नागपूर : शहरातील लकडगंज पोलीस ठाणे येथे शुक्रवारी धक्कादायक प्रकार घडला. पोलिस शिपाई किरण विश्वनाथ कुकलरे (वय २८) याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व सहकाऱ्यांशी गैरवर्तन करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर कुकलरे यांची पत्नी आपल्या भावासह लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. कुटुंबीय छळाबाबत तक्रार नोंदवली जात असताना शिपाई कुकलरे अचानक पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे तक्रार नोंदविण्याचे काम करत होते.
दरम्यान, कुकलरे याने संतापाच्या भरात आरडाओरडा करत शिवीगाळ केली आणि सहकाऱ्यांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने इतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला आवरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचीही माहिती आहे.
या प्रकरणी संबंधित शिपायाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे व सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून विभागीय चौकशीही होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.