‘अनफिट’ ठरवलेल्या ७८ वर्षीय वृद्धावर ‘हर्निया’ची शस्त्रक्रिया यशस्वी !
By सुमेध वाघमार | Updated: January 8, 2026 19:32 IST2026-01-08T19:26:10+5:302026-01-08T19:32:49+5:30
मेडिकलच्या डॉक्टरांना यश : ‘अब्डोमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शन’ने पोटाला दिला आकार

Hernia surgery on 78-year-old man who was deemed 'unfit' is successful!
नागपूर: एकीकडे वयाची सत्तरी ओलांडलेली, दुसरीकडे फुप्फुसाचा गंभीर आजार (फायब्रोसिस) आणि तिसरीकडे पोटावर असलेला महाकाय अंबिलिकल हर्निया... अशा अत्यंत क्लिष्ट परिस्थितीत असलेल्या ७८ वर्षीय रुग्णावर नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील जनरल सर्जरी शल्यक्रिया विभागाच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून वैद्यकीय कौशल्याचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. अमरावती येथील रुग्णालयांनी शस्त्रक्रियेसाठी ‘अनफिट’ ठरवलेल्या या रुग्णाला मेडिकलच्या डॉक्टरांनी जीवदान दिले.
शंकरराव (बदललेले नाव) रुग्णाला पोटावर मोठा ‘अंबिलिकल हर्निया’ होता. त्यांच्या डाव्या फुप्फुसात ‘फायब्रोसिस’ असल्याने त्यांना नैसर्गिकरीत्याच श्वास घेण्यास त्रास होत होता. श्वसनाच्या या विकारामुळे पोटावर दाब पडून हर्नियाचा आकार सतत वाढत होता. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, हर्नियावरील त्वचा अतिशय पातळ होऊन तिथे अल्सर (जखम) तयार झाले होते. ही त्वचा कधीही फाटून रुग्णाचा जीव जाण्याची भीती होती. अशा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण भूल देणे फुप्फुसाच्या आजारामुळे अशक्य होते. त्यामुळे डॉक्टरांसमोर रिजनल स्पाइनल अनस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान होते.
पोटाचा मोठा हर्निया असल्यामुळे रुग्णाच्या श्वसनक्रियेचे तंत्र बिघडले होते. या शस्त्रक्रियेला शास्त्रीय भाषेत ‘अब्डोमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शन’ असे संबोधले जाते. शल्यचिकित्सा शास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. एम. कुरेशी यांनी रुग्णाची तपासणी करून तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मात्र, फुप्फुसाची क्षमता कमी असल्याने ऑपरेशनपूर्वी रुग्णाकडून विशेष श्वसन व्यायाम करून घेण्यात आले. भूलतज्ज्ञांच्या चमूने अतिशय जोखमीच्या परिस्थितीत भूल देण्याचे काम चोख बजावले, तर सर्जनच्या टीमने पोटाच्या स्नायूंची पुनर्रचना करून हर्नियाचा अडथळा दूर केला. यामुळे आता रुग्णाचे फुप्फुस अधिक क्षमतेने कार्य करण्यास सक्षम झाले आहे.
या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम डॉ. ए. एम. कुरेशी, डॉ. गिरीश उमरे, डॉ. रितेश बोदडे, डॉ. अखिलेश कांबळे, भूलतज्ज्ञ डॉ. ढोमणे, डॉ. योगेश झंवर, डॉ. ज्युली टिपले यांनी फत्ते केली.
योग्य नियोजन व टीमवर्कचे हे यश
"हा रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत अमरावतीहून आमच्याकडे पाठविण्यात आला होता. श्वसनविकारामुळे शस्त्रक्रिया करणे कठीण होते, पण योग्य नियोजन आणि टीमवर्कमुळे आम्ही यशस्वी ‘अब्डोमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शन’ करू शकलो. आता रुग्ण धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे."
- डॉ. ए. एम. कुरेशी, विभाग प्रमुख, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग मेडिकल