विदर्भात मुसळधार पावसाचा कहर; २४ तासांत ६ मृत्यू, १ बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:31 IST2025-07-10T12:30:45+5:302025-07-10T12:31:09+5:30

Nagpur : नागपूर, गोंदियात प्रत्येकी दोन, वर्धा, भंडारा जिल्ह्यांत एकेक बळी; यवतमाळात युवक बेपत्ता

Heavy rains wreak havoc in Vidarbha; 6 deaths, 1 missing in 24 hours | विदर्भात मुसळधार पावसाचा कहर; २४ तासांत ६ मृत्यू, १ बेपत्ता

Heavy rains wreak havoc in Vidarbha; 6 deaths, 1 missing in 24 hours

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
विदर्भात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मृत्यूच्या सत्राने हाहाकार उडवला आहे. मागील २४ तासांत नागपूर, गोंदिया, वर्धा आणि भंडारा या चार जिल्ह्यांत पावसामुळे तब्बल सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तर यवतमाळमध्ये पुरात एक इसम वाहून गेला आहे, त्याचा शोध लागला नाही. नागपूरच्या नरसाळा हुडकेश्वर भागात एक इसम पाण्यात वाहून गेला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.


नागपूर जिल्ह्यात मागील १२ तासांत सरासरी १३७.४ मिमी पाऊस कोसळला. नदी व नाल्यांच्या पुरात दोघे वाहून गेले असून, यातील एकाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. अनिल हनुमंत पानपत्ते (४०, रा. बोरगाव बुजुर्ग, ता. कळमेश्वर) व कार्तिक शिवशंकर लाइसे (१८, रा. उप्पलवाडी, ता. नागपूर ग्रामीण) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. पावसामुळे बोरगाव (बु) गावालगतच्या नाल्याला पुलावरून पाणी वाहत असताना अनिलने बुधवारी (दि. ९) सकाळी ७:३० च्या सुमारास पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि प्रवाहात वाहून गेला. रत्याचा थांगपत्ता लागला नाही. कार्तिक लाडसे हा त्याच्या गावालगतच्या नाल्यात बुधवारी सकाळी वाहून गेला. दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे धावत्या कारवर रस्त्यालगतचे झाड कोसळल्याने कारमधील दोघे ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ९) सकाळी ८:३० वाजता शहरातील आरामशीनसमोर घडली. तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ९) सकाळी ८:३० वाजता शहरातील आरामशीनसमोर घडली. तीन जण बुधवारी सकाळी कार क्रमांक एमएच ३१, सीआर १५४९ ने उमझरी मध्यम प्रकल्प येथे मासे आणण्यासाठी निघाले होते. त्यांनी सडक अर्जुनी येथील पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरले. ते उमझरीकडे निघत असताना अचानक येथील आरामशीनसमोरील रस्त्यालगतचे एक झाड त्यांच्या कारवर कोसळले. यात कारमधील वासुदेव खेडकर व आनंदराव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रितीक दिघोरे हा गंभीर जखमी झाला. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घाडगे) तालुक्यातील बोंदर ठाणा येथील युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. बुधवारी त्याचा मृतदेहच आढळून आला. प्रफुल्ल दत्तूजी शेंद्रे (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रफुल्ल बाजारगाव येथील एका कंपनीत कामाला होता. मंगळवारी रात्रपाळी आटोपून तो प्रथम कारंजा येथे आला. तेथून आपल्या दुचाकीने (क्र.एमएच ३१ डीडी ००१९) गावाकडे निघाला असता, राजनीनजीक खडका नदी पुलावरील पाण्यात वाहून गेला. बुधवारी पुलापासून दीड किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. यवतमाळच्या वणी तालुक्यातील झरी जामणी तालुक्यातील धानोरा येथील सतीश शंकर दुर्गावर (४०) शेतातून परतत असताना पुरात वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत नाला परिसरात शोधमोहीम सुरू होती.


पूरस्थिती नियंत्रणात - मुख्यमंत्री फडणवीस
पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे काही प्रवासी एसटीमध्ये अडकले होते. त्यांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूपपणे घरी पाठवण्यात आले आहे. गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग बंद असून, पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरातील सखल भागात बचाव कार्य सुरू आहे. या पूरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याचीही माहिती मिळाली आहे. आजही नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Web Title: Heavy rains wreak havoc in Vidarbha; 6 deaths, 1 missing in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.