धोधो पावसाने विदर्भात हजेरी; वाशिमच्या मालेगावात सर्वाधिक 145.1 मि.मी. पाऊस
By निशांत वानखेडे | Updated: June 26, 2025 20:07 IST2025-06-26T19:58:50+5:302025-06-26T20:07:07+5:30
28 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम! : हवामान विभागाचा अलर्ट जारी

Heavy rains lashed Vidarbha; Malegaon in Washim received the highest rainfall of 145.1 mm.
नागपूर : दाेन दिवसांपासून हळुवार सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी तिसऱ्या दिवशी चांगलाच वेग घेतला. विदर्भात बुधवारी रात्री सर्वदूर धाे-धाे पाऊस काेसळला. गुरुवारी दिवसभर पूर्व विदर्भात उघडीप दिली पण पश्चिम विदर्भात पावसाचा धुमाकूळ कायम हाेता. विशेषत: वाशिम, अकाेला, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली.
बुधवारी दिवसभर शांत राहिलेल्या पावसाला सायंकाळपासून चांगलाच जाेर चढला. नागपूर शहरात रात्री १०.३० ते ११.३० पर्यंत तासभर धाे-धाे सरी बरसल्या. गुरुवारी सकाळपर्यंत शहरात ३२.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यात सावनेर तालुक्यात सर्वाधिक ५६ मि.मी. पाऊस झाला. दिवसभर मात्र ढग शांत राहिले. पावसाची सर्वाधिक तीव्रता यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात बघायला मिळाली. वाशिममध्ये सकाळी ८.३० पर्यंत १२२.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. मुसळधार पावसाची तीव्रता दिवसभर कायम हाेती. येथे दिवसा ७३ मि.मी. पाऊस झाला. वाशिमच्या मालेगाव भागात विदर्भात सर्वाधिक १४५.१ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यवतमाळ शहरात सकाळपर्यंत ६६.६ मि.मी. पाऊस झाला. दिवसासुद्धा पावसाची संततधार सुरू हाेती. या जिल्ह्यातील घाटंजी सर्कलमध्ये १२९.७ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे.
अकाेला आणि वर्धा जिल्ह्यालाही गुरुवारी दिवसभर पावसाने धुम केली. सायंकाळपर्यंत अकाेल्यात ६९ मि.मी. आणि वर्ध्यात ५४ मि.मी. पाऊस झाला. बुलढाण्यात रात्री ४७ मि.मी आणि दिवसभर १८ मि.मी.पावसाची नाेंद झाली आहे. भंडारा व गाेंदिया जिल्ह्यातही पावसाची चांगली हजेरी लागली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची ही तीव्रता आणखी दाेन दिवस २८ जूनपर्यंत कायम राहणार आहे.