महिनाभर आधीच कळतो हार्ट अटॅक; लक्षणे समजणे महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:09 IST2025-07-07T13:08:35+5:302025-07-07T13:09:24+5:30

Nagpur : सुरुवातीचे ६ तास महत्त्वाचे

Heart attack can be detected a month in advance; It is important to understand the symptoms | महिनाभर आधीच कळतो हार्ट अटॅक; लक्षणे समजणे महत्वाचे

Heart attack can be detected a month in advance; It is important to understand the symptoms

डॉ. नागेश वाघमारे
नागपूर :
हार्ट अटॅक येण्याआधी रुग्णांना स्वतःमध्ये जाणवणारे बदल सूक्ष्म असू शकतात. उदा. रोजचे काम करताना किंचित थकवा जाणवणे, इमारतीच्या नेहमीच्या मजल्यावर चढताना श्वास लागणे, चालताना दोन्ही हातांमध्ये जडपणा जाणवणे, किरकोळ कामे करताना गळा दाटल्यासारखा वाटणे, किराणा सामान उचलताना किंवा स्वच्छता करताना छातीत जडपणा, थोडी घुसमट, घाम येणे, चक्कर येणे इत्यादी लक्षणे काही क्षण थांबल्यावर आपोआप कमी होतात.


काही रुग्णांना जेवणानंतर छातीत अडकल्यासारखे वाटते. थोडीशी घुसमटही जाणवते, जी १० ते १५ मिनिटांपर्यंत असते. बऱ्याच वेळा आपण या लक्षणांचे कारण अॅसिडिटी, थकवा, सर्दी-खोकला यांच्याशी जोडतो. काही वेळा सोसायटीमधील स्पर्धांमध्ये सहभाग, प्रवास अशा घटनांनंतरही अशी लक्षणे जाणवतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये झोपेत घुसमट होऊन रुग्ण अचानक उठतो आणि बसल्यानंतर थोडे बरे वाटते. काही जोडप्यांमध्ये शारीरिक संबंधांच्या वेळी छातीत जडपणा, दम लागणे अशी लक्षणे दिसून येतात. या पार्श्वभूमीवर, आपण सर्वानी नियमित स्वरूपात आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे. सहज घरी तपासता येणारे म्हणजे वजन, नाडीचा वेग, ऑक्सिजनची पातळी, रक्तदाब व गरजेनुसार साखरेची पातळी. त्यामध्ये एखादा अचानक बदल दिसल्यास डॉक्टरांकडे जाऊन खात्री करावी. 


काही संकेत लक्षात येत नाहीत...
आपल्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे काही संकेत आपल्या लक्षात येत नाहीत. उदा. वजनात बदल, पाय सुजणे, विश्रांतीच्या वेळेस हृदयाची गती वाढणे, लघवीची वेळ बदलणे किंवा वारंवार लघवीला जाण्यास वाटणे तसेच रक्तदाबात चढउतार होणे.


सुरुवातीचे ६ तास महत्त्वाचे
बहुसंख्य वेळा लोक हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांना अॅसिडिटी समजतात व घरगुती उपाय अथवा औषधांवर अवलंबून राहतात. 'माझं तर सगळं ठणठणीत आहे, मला हृदयविकार कसला?' ही धारणा आपल्यात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळेच डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यात उशीर होतो. माझ्या अनुभवाने बोलायचं झालं तर, हृदयविकाराचा रुग्ण १२ ते २४ तासांनी डॉक्टरांकडे येतो. पण 'गोल्डन अवर्स' म्हणजे सुरुवातीचे ६ तास महत्त्वाचे असतात. लक्षात ठेवा, वेळेवर उपचार मिळाले तर जीव वाचू शकतो! 

Web Title: Heart attack can be detected a month in advance; It is important to understand the symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.