आईच्या अंत्यसंस्कारानंतर पाहुणे परत गेले; मुलाने रूम बंद करून घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:57 IST2026-02-14T19:52:42+5:302026-02-14T19:57:47+5:30
Nagpur : आईच्या मृत्यूनंतर मुलानेच मध्यरात्री गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना केळवद पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम रायबासा (ता. सावनेर) येथे घडली.

Guests went back after mother's funeral; son locked himself in the room and hanged himself
लोकमत न्यूज नेटवर्क
केळवद : आईच्या मृत्यूनंतर मुलानेच मध्यरात्री गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना केळवद पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम रायबासा (ता. सावनेर) येथे घडली. वृद्ध आईच्या अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच मुलाने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. रामू दयाराम मसराम (वय ५०) असे मृत मुलाचे नाव आहे. रामू यांनी गुरुवारच्या (दि. १२) मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रामूची आई मन्नाबाई दयाराम मसराम (वय ७५) यांचे बुधवारी (दि. ११) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले होते. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता मन्नाबाई यांच्या पार्थिवावर गावातील घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या अंत्यसंस्कारानंतर बाहेरून आलेले नातेवाईक परत गेले. त्यानंतर रामू यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले व आतून दार बंद करून घेतले. कुटुंबीयांना वाटले की, रामू आतून दार बंद करून झोपले असावेत. मात्र शुक्रवारी सकाळी वारंवार आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने संशय निर्माण झाला. अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रामू गळ्यात साडी बांधून पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच केळवद पोलिस ठाण्याचे ठाणेदार आशिषसिंह ठाकूर, उपनिरीक्षक के. के. रिझवाड, प्रकाश जवळकर यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरविला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सावनेर येथील सरकारी रुग्णालयात पाठविला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास केळवद पोलिस करीत आहेत. रामूच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मुलीचे एप्रिलमध्ये लग्न...
वृद्ध आईच्या पाठोपाठ मुलाने आत्महत्या केल्याने रायबासा गावावर दुहेरी शोककळा पसरली आहे. रामू यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या मुलीचे साक्षगंध एक महिन्यापूर्वी झाले असून एप्रिल महिन्यात तिचा विवाह सोहळा संपन्न होणार होता.