अंगूर, कांदे, बटाटे अन् रेशिम कोषमुळे रेल्वेची तिजोरी सिल्की सिल्की
By नरेश डोंगरे | Updated: January 1, 2026 20:19 IST2026-01-01T19:36:32+5:302026-01-01T20:19:46+5:30
‘शेतकरी समृद्धी स्पेशल’ ट्रेन : बिहार, कर्नाटकसह पश्चिम बंगालमध्येही शेती उत्पादनांची निर्यात

Grapes, onions, potatoes and silkworms make the railway coffers silky silky
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रासह आजुबाजुच्या राज्यात उत्पादित केल्या जाणाऱ्या आणि देशातील विविध प्रांतात प्रचंड मागणी असणाऱ्या कृषी उत्पादनांवर मध्य रेल्वेने नजर केल्यामुळे अंगूर, कांदे, बटाटे अन् आता रेशिम कोषही रेल्वेला पसंती देत आहे. परिणामी रेल्वेच्या तिजोरीत पालेभाज्या, फळांच्या माध्यमातून कोट्यवधींची गंगाजळी जमा होत आहे.
रेल्वेच्या मालवाहतूकीचा आतापर्यंत सर्वाधिक जोर विदर्भातील कोळसा, सिमेंट आणि राखेच्या मालवाहतूकीवर होता. त्यातून रेल्वे कोट्यवधींची कमाईदेखिल करीत होती. मात्र, मालवाहतुकीची दायरा प्रशस्त करण्यासाठी मध्य रेल्वेकडून गेल्या वर्षभरापासून विविध प्रयत्न केले गेले. त्यानंतर लोखंड, गाैण खनिजे, तसेच धान्य, साखरेचीही वाहतूक महाराष्ट्रातून केली जाऊ लागली. त्यापाठोपाठ कंटेनर, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांना रेल्वेने वाहून नेण्याचेही प्रयोग यशस्वी झाले. त्यातून कोट्यवधींची घसघशित कमाई होत असल्याचे पाहून आता मध्य रेल्वेने पालेभाज्या, अंगूर, कांदे, बटाटे आणि गहू, तांदुळाला रेल्वेत आणले. आता पंढरपूर, सोलापूर (महराष्ट्र) जिल्ह्यातून रेशिम कोष (सिल्क कोकून)चे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असल्याचे पाहून तेथून थेट कर्नाटकसाठी मालवाहतूकीचा ट्रॅक सुरू केला. त्यामुळे आशियातील सर्वात मोठ्या रेशिम कोषाची बाजारपेठ असलेल्या रामनगरम (कर्नाटक) येथे पंढरपूर, सोलापूरचे रेशिम कोष थेट रेल्वेने पोहचू लागले. नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ या अवघ्या दोन महिन्यात १४९३९ किलो रेशिम कोषचे ५३५ पार्सल तेथे पोहचविण्यात आले आणि त्यातून कोट्यवधींचा महसूलही 'रेल्वेचा कोष सिल्की' करून गेला.
नाशिकचा भाजीपाला थेट बिहारात
नाशिकचे अंगूर आणि कांदा तसेच पालेभाज्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांची निर्यात देशातील विविध प्रांतात होते, ते हेरून रेल्वेने देवळाली (जि. नाशिक) येथून थेट दानापूर (बिहार) पर्यंत ‘शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेन' सुरू केली. कमी भाड्यात चांगला भाव असलेल्या राज्यात आपला माल विकायला नेता येतो, हे ध्यानात आल्याने आता शेतकऱ्यांची पावलंही रेल्वेच्या मालगाडीकडे वळू लागली आहेत. कृषी माल उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने गेल्या अवघ्या दोन महिन्यात ‘शेतकरी समृद्धी स्पेशल’च्या ६३ फेऱ्या विविध प्रांतात झाल्या आहेत. त्यातून ९,०४४ टनांपेक्षा जास्त मालाची वाहतूक करून रेल्वेने ३.२४ कोटींची कमाई केली आहे.