वाचन प्रेमींसाठी खुशखबर ! नागपूरमध्ये होणार भव्य राष्ट्रीय पुस्तक महाेत्सव; नामवंत लेखक, वक्ते हाेणार सहभागी
By निशांत वानखेडे | Updated: September 30, 2025 20:29 IST2025-09-30T20:27:08+5:302025-09-30T20:29:42+5:30
Nagpur : केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नॅशनल बूक ट्रस्ट ऑफ इंडिया आणि झिराे माईल युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य भारतातील सर्वात माेठ्या पुस्तक महाेत्सवाचे आयाेजन नागपूरला हाेत आहे.

Good news for reading lovers! A grand National Book Festival will be held in Nagpur; Renowned writers, speakers will participate
नागपूर : केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नॅशनल बूक ट्रस्ट ऑफ इंडिया आणि झिराे माईल युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य भारतातील सर्वात माेठ्या पुस्तक महाेत्सवाचे आयाेजन नागपूरला हाेत आहे. विविध भाषा, अनेक विषय आणि प्रत्येक वयाेगटाला आकर्षित करतील अशी लक्षावधी पुस्तके या महाेत्सवात उपलब्ध हाेणार आहेत. देशभरातील नामवंत लेखक, प्रकाशक, वक्ते या महाेत्सवात सहभागी हाेणार असून ती नागपूरकरांसाठी ज्ञानवर्धक मार्गदर्शन मिळण्याची संधी ठरणार आहे.
नॅशनल बूक ट्रस्टचे चेअरमन प्रा. मिलिंद मराठे आणि संचालक युवराज मलिक यांनी मंगळवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना संपूर्ण आयाेजनाची माहिती दिली. २२ ते ३० नाेव्हेंबर यादरम्यान हा पुस्तक महाेत्सव चालणार आहे. पहिल्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रसिद्ध साहित्यिक अमिष त्रिपाठी यांच्या उपस्थितीत महाेत्सवाचे सायंकाळी उद्घाटन हाेईल. ३०० स्टाॅल्समध्ये स्पर्धा परीक्षा, अभ्यासक्रम, विज्ञान तंत्रज्ञान, बाॅयाेग्राफी, मानसिक शांती, फिटनेस ते आध्यात्मापर्यंतच्या विषयाच्या लक्षावधी पुस्तका यात उपलब्ध राहणार आहेत. विशेषत्वाने विद्यार्थी व तरुणांचे लक्ष वेधणाऱ्या पुस्तकांचा समावेश यात असेल.
महाेत्सवाच्या प्रचार-प्रसाराचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. लेखक, प्रकाशक, साहित्य संस्था, शिक्षण संस्था, ग्रंथपाल यांचे प्रतिनिधींचा सहभाग येथे असणार आहे. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासह क्षेत्रातील सहा विद्यापीठे, तसेच महापालिका, महामेट्राे व इतर संस्थांचाही महाेत्सवात लेखक त्यांच्या नवीन पुस्तकांचे प्रकाशन करू शकतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशांत कुकडे, समय बन्साेड, कल्याण देशपांडे आदी उपस्थित हाेते.
नामवंत लेखक, वक्ते येणार
सुपर-३० चे आनंद कुमार, शशी थरूर, जावेद अख्तर, शिव खेडा, सुशांत सरीन, नितीन गाेखले असे देशातील ख्यातकीर्त लेखक, वक्ते या पुस्तक महाेत्सवात सहभागी हाेतील, अशी माहिती प्रा. मराठे यांनी दिली. महाेत्सावात २३ नाेव्हेंबर आणि २८ व २९ नाेव्हेंबरला त्यांचे मार्गदर्शन ऐकण्याची, संवाद साधण्याची संधी तरुणांना मिळेल.
मुलांसाठी कॅम्प, दरराेज सांस्कृतिक मेजवानी
मुलांना आकर्षित करण्यासाठी दरराेज चिल्ड्रेन कॅम्प हाेणार असून यात स्टाेरी टेलिंग, चित्रकला, पपेट्री अशा ३० ते ३५ प्रकारच्या अॅक्टीव्हीटीमध्ये ते सहभागी हाेऊ शकतील. याशिवाय दरराेज सायंकाळी देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजनही हाेणार आहे.