एकता, विश्वासाच्या बळावर भारतात सुवर्णयुग अवतरेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:02 IST2026-02-26T13:01:30+5:302026-02-26T13:02:09+5:30
Nagpur : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या भूमीत जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांनी देशाला दिशा दिली आहे.

Golden age will dawn in India on the strength of unity and faith: President Draupadi Murmu
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या भूमीत जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांनी देशाला दिशा दिली आहे. याच महाराष्ट्रात ब्रह्माकुमारीजने एकता व विश्वासाच्या माध्यमातून स्वर्णिम महाराष्ट्राचे स्वप्न बघितले आहे. ब्रह्माकुमारीजतर्फे राबविण्यात येत असलेल्या नकारात्मक विचार अभियानातून त्यागून महाराष्ट्राची जनता सकारात्मकतेची कास धरेल. आंतरिक शांती, परस्पर सौहार्दतेतून ब्रह्माकुमारीच्या एकता आणि विश्वासाची मोहीम प्रभावीपणे कार्य करेल व महाराष्ट्रासह देशात सुवर्णयुग अवतरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.
'एकता व विश्वासाने महाराष्ट्राचे स्वर्णयुग' या ब्रह्माकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी जामठा येथील विश्वशांती सरोवर येथे झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माउंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी चंद्रिकादीदी, ब्रह्माकुमारीज नागपूरच्या प्रमुख राजयोगिनी रजनीदीदी उपस्थित होते. राजयोगिनी रजनीदीदी यांनी प्रास्ताविक केले.
ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव मृत्युंजयभाई यांनी ब्रह्माकुमारीजच्या वतीने महाराष्ट्रात सुरू होत असलेल्या मोहिमेविषयी माहिती दिली. राजयोगिनी चंद्रिकादीदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या राज्यव्यापी मोहिमेसाठी ब्रह्माकुमारीजमार्फत आठ सिद्धांत निश्चित करण्यात आले आहेत.
या सिद्धांतातूनच स्वर्णिम युगाचा प्रत्यय बळकट होणार असून, तालुका पातळीवरील ब्रह्माकुमारीजच्या केंद्रांमार्फत ही मोहीम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. याप्रसंगी राष्ट्रपतींनी देशात राबविण्यात येणाऱ्या 'एक भारत श्रेष्ठ भारत', 'डिजिटल इंडिया' व देशात पायाभूत सुविधांचे निर्माण होणारे जाळे यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये विकसित भारत घडविण्याचा विश्वास निर्माण होत असल्याचे नमूद केले.
प्रगतीसाठी एकता आणि विश्वास महत्त्वाचा : राज्यपाल देवव्रत
ज्या भूमीत एकता आणि विश्वास आहे, त्याची प्रगती कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. ब्रह्माकुमारीचे कार्य संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारे आहे. एकता हाच शांतीचा मंत्र आहे आणि विश्वास असेल तरच एकता निर्माण होते. वेद हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. प्रेमामुळेच जगात शांती व समृद्धी नांदू शकते, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले.
जागृत समाजामुळेच कल्याणकारी कार्यक्रमांना बळ : बावनकुळे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जागृत समाज हा शासनाच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांना बळ देतो. हाच संदेश पुढे नेत एकता व विश्वासावर आधारित ब्रह्माकुमारीजचे अभियान हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. मानवतेला पुढे नेणारा हा उपक्रम विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.