३ दिवसांत सोने रु. १६००, चांदी रु. २००० ने वधारली : महागाईचा तडाखा
By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 3, 2025 19:34 IST2025-06-03T19:34:13+5:302025-06-03T19:34:53+5:30
सोने रु. ९७,००० आणि चांदी रु. १,००,३०० किलो : बाजारात खळबळ

Gold rose by Rs. 1600, silver by Rs. 2000 in 3 days: Inflation hits
मोरेश्वर मानापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मौल्यवान धातू सोने-चांदीचे भाव जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच वाढत आहेत. ३ जून रोजी ३ टक्के जीएसटीसह सोने एक लाखांवर आणि चांदीचे प्रति किलो भाव १ लाख ५ हजार रुपयांवर पोहोचले. वाढत्या किमतीमुळे सामान्य ग्राहक खरेदीपासून दूर जात आहे.
दागिने निर्मितीसाठी उपयोगात येणारे २२ कॅरेट निव्वळ सोन्याचे भाव ३ टक्के जीएसटीसह ९३ हजारांवर गेले आहे. केवळ जून महिन्यात तीन दिवसांची आकडेवारी पाहिल्यास सोने आणि चांदीत अनुक्रमे १,६०० रुपयांची वाढ झाली. ३१ मे रोजी जीएसटीविना दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ९५,६०० आणि चांदीचे भाव प्रति किलो ९७,७०० रुपयांवर स्थिर होते. चालू आठवड्यात सोमवारी सोने १,४०० आणि चांदी तब्बल २,६०० रुपयांनी वाढून जीएसटीविना सोने ९७ हजार आणि चांदी १,००,३०० रुपयांवर पोहोचली. ३ रोजी सोने २०० आणि चांदीत १,६०० रुपयांची वाढ झाली. दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव पुढे किती वाढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.