एका महिन्यात सोने ७,८००, चांदीत ३० हजारांची विक्रमी वाढ; गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:59 IST2025-12-04T19:51:37+5:302025-12-04T19:59:30+5:30
Nagpur : गेल्या एका महिन्याच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल ७,८०० ची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे ३० हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली.

Gold prices rise by Rs 7,800, silver by Rs 30,000 in a month; investors are excited
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या एका महिन्याच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल ७,८०० ची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे ३० हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली.
विशेष म्हणजे, या तेजीमुळे मंगळवारच्या तुलनेत बुधवारी एकाच दिवसात सोने ९०० रुपयांनी तर चांदीचे दर ५,५०० रुपयांनी वाढले. हा विक्रमी 'भाव वाढीचा' ट्रेंड पाहून सराफा बाजारात तसेच गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांसाठी सोने-चांदी पुन्हा एकदा सर्वाधिक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक म्हणून सिद्ध होत आहे. सोन्या-चांदीच्या दरातील ही मोठी वाढ प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक अनिश्चितता आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणांचा थेट परिणाम आहे.
औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मोठी मागणी
सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये चांदीची मागणी वाढली आहे. दरात झालेल्या वाढीमुळे नफा कमावण्याची संधी आहे.
आर्थिक अनिश्चिततेचा परिणाम
जागतिक स्तरावर विविध ठिकाणी भौगोलिक आणि राजकीय तणाव वाढला आहे. अशा अनिश्चित परिस्थितीत, गुंतवणूकदार जोखीम कमी करण्यासाठी इक्विटी किंवा इतर अस्थिर मालमत्तांमधून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेत गुंतवित आहेत. जगभरात महागाईचा दर अजूनही उच्च असल्याने, गुंतवणूकदार महागाईच्या नुकसानीपासून बचावासाठी सोने आणि चांदीकडे वळत आहेत.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्याची तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन दृष्टीने सोने आणि चांदीचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असून गुंतवणूक उत्कृष्ट परतावा देणारी ठरू शकते.
सोने आणि चांदीचे दर (रुपयांत)
तारीख २४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) चांदी (किलो)
३ नोव्हेंबर १,२१,१०० १,५१,०००
२ डिसेंबर १,२८,००० १,७६,३००
३ डिसेंबर १,२८,९०० १,८१,८००
(सोने-चांदीच्या दरावर ३ टक्के जीएसटी वेगळा)