डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयानंतर सोन्याचे दर विक्रमी पातळीवर; जीएसटीविना ८०,४०० रुपये
By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 22, 2025 18:58 IST2025-01-22T18:57:44+5:302025-01-22T18:58:31+5:30
महिन्यात ३,५०० रुपयांची वाढ

डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयानंतर सोन्याचे दर विक्रमी पातळीवर; जीएसटीविना ८०,४०० रुपये
नागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये दिसू लागला आहे. भारतात शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली, तर दुसरीकडे सोन्याचे दराने विक्रमी झेप घेतली. बुधवारी नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ७०० रुपयांनी वाढून विक्रमी ८०,४०० रुपयांवर पोहोचले. हेच दर ३ टक्के जीएसटीएस ८२,८१२ रुपयांवर गेले.
नवीन वर्षात १ जानेवारीला दहा ग्रॅम शुद्ध सोने ७६,९०० रुपयांवर होते. २२ दिवसांत ३,५०० रुपयांनी वाढले. चांदीच्या दरातही एका दिवसात ७०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ९२,२०० रुपयांवर गेली. यंदा जानेवारी महिन्यात चांदीचे दर किलोमागे ५,५०० रुपयांनी वाढले. ३ टक्के जीएसटीसह चांदी ९४,९६६ रुपयांवर पोहोचली. १ जानेवारीला दर ८६,६०० रुपये किलो होते.
सन २०२४ मध्ये दिवाळीला सोन्याचे जीएसटीविना दर ८० हजार रुपये आणि चांदीचे प्रतिकिलो दर ९७,५०० रुपयांवर होते. गत वर्षातील दोन्ही मौल्यवान धातूंच्या दराची आकडेवारी पाहिल्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी दहा ग्रॅम सोने ७०,४०० रुपये तर प्रतिकिलो चांदीचे दर ८०,५०० रुपये होते, हे विशेष. पुढे सोने-चांदीच्या दरात दरवाढीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.