'आयसीआयसीआय' बँकेमध्ये २३ कोटींचा गोल्ड लोन घोटाळा ! खोटे सोने ठेवून घेतले कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:53 IST2026-04-01T18:52:05+5:302026-04-01T18:53:08+5:30
Nagpur : आयसीआयसीआय बँकेत तब्बल २३ कोटींहून अधिक रकमेचा गोल्ड लोन घोटाळा उघडकीस आला आहे. १५९ खातेदारांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज उचलले व आश्चर्याची बाब म्हणजे सोन्याचे मूल्यांकन करणाऱ्या व्हॅल्युअर, ऑडिटरनेदेखील त्याला हिरवी झेंडी दाखविली.

Gold loan scam of Rs 23 crore in ICICI Bank! Loan taken by keeping fake gold
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयसीआयसीआय बँकेत तब्बल २३ कोटींहून अधिक रकमेचा गोल्ड लोन घोटाळा उघडकीस आला आहे. १५९ खातेदारांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज उचलले व आश्चर्याची बाब म्हणजे सोन्याचे मूल्यांकन करणाऱ्या व्हॅल्युअर, ऑडिटरनेदेखील त्याला हिरवी झेंडी दाखविली. धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
बँकेमार्फत ग्राहकांना सोन्याचे दागिने तारण ठेवून गोल्ड लोन दिले जाते. त्यासाठी बँकेकडून नियुक्त केलेले व्हॅल्युअर दागिन्यांची शुद्धता व वजन तपासून त्यानुसार कर्ज मंजूर करतात. बँकेच्या मनीषनगर शाखेत गोल्ड लोन ऑडिट करण्यात आले असता तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे निदर्शनास आले. यामुळे अधिकाऱ्यांना धक्का बसला. त्यानंतर झोनल स्तरावर संपूर्ण गोल्ड लोन व्यवहारांचे सखोल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. या तपासात बँकेच्या एकूण ९ शाखांमधील १५९ खातेदारांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतल्याचे उघड झाले. ही बाब संपूर्ण बँकेच्या वर्तुळाला हादरविणारी ठरली.
याची सखोल तपासणी केली असता त्यात बँकेचे व्हॅल्यूअर, ऑडिटर व शाखाप्रमुख यांचादेखील समावेश असल्याची बाब समोर आली जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत खातेदार सचिन राऊत, व्हॅल्युअर नंदू खरवडे, प्रथम ऑडिटर राजेंद्र शिलनकर, प्रमोद टेटे, धनंजय ढोमणे, शाखा प्रमुख पंकज केकतपुरे तसेच इतर १५२ खातेदारांनी संगनमताने कट रचून बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचा भास निर्माण केला. त्याद्वारे बँकेकडून गोल्ड लोन घेऊन बँकेला २३.१९ कोटींचा गंडा घातला. अजनी चौकातील झोनल कार्यालयातील प्रमुख धनंजय रमेश थिटे यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहकारी बँकांचे लोण खासगी बँकांत
नागपुरात याअगोदर सोन्याच्या व्हॅल्युअरला हाताशी धरून गोल्ड लोनमध्ये हेराफेरी करण्याचे प्रकार घडले आहे. यात काही सोनारांचादेखील समावेश होता. आता तोच प्रकार आयसीआयसीआयसारख्या मोठ्या खासगी बँकेत आढळल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.