विदर्भाच्या 'काळ्या सोन्या'त उगवली चक्क 'रत्ने'; ५०० नमुन्यांतून उलगडणार पृथ्वीचा गुप्त खजिना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:14 IST2026-02-28T15:10:44+5:302026-02-28T15:14:16+5:30
Nagpur : विदर्भातील वेस्टर्न कोल्ड फिल्ड्स (डब्ल्यूसीएल) च्या खाणींमध्ये जणू पृथ्वीने स्वतःचा गुप्त खजिनाच उघडला आहे. कोळशाच्या काळ्या थरांआड लाखो वर्षे लपून बसलेले दुर्मीळ आणि धोरणात्मक धातू आता विदर्भाच्या भवितव्याला हिरेजडित तेज देण्यासाठी समोर येत आहेत.

'Gems' sprouted in Vidarbha's 'black gold'; 500 samples to reveal Earth's hidden treasures
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील वेस्टर्न कोल्ड फिल्ड्स (डब्ल्यूसीएल) च्या खाणींमध्ये जणू पृथ्वीने स्वतःचा गुप्त खजिनाच उघडला आहे. कोळशाच्या काळ्या थरांआड लाखो वर्षे लपून बसलेले दुर्मीळ आणि धोरणात्मक धातू आता विदर्भाच्या भवितव्याला हिरेजडित तेज देण्यासाठी समोर येत आहेत. इथे सापडलेले रेनिअम, टायटॅनियम, पोटॅश आणि टेल्युरियम यांसारखे मौल्यवान धातू भविष्यात देशाच्या संरक्षण, अवकाश, शेती आणि हरित ऊर्जा क्षेत्रासाठी 'गेमचेंजर' ठरणार आहेत, यामुळे 'डब्ल्यूसीएल'चे महत्त्व आता जागतिक नकाशावर वाढणार आहे.
केंद्र सरकारच्या 'क्रिटिकल मिनरल्स' उपक्रमांतर्गत विविध कोलफिल्ड्समध्ये दुर्मीळ घटकांच्या शोधाला सध्या वेग आला आहे. 'डब्ल्यूसीएल'ने आपल्या विविध क्षेत्रांतील ६ उघड्या खाणींमधून सुमारे ५०० नमुने गोळा केले होते. या नमुन्यांचे 'एलिमेंटल अनालिसिस' (घटक विश्लेषण) केले असता, त्यात या मौल्यवान धातूंचे अस्तित्व आढळून आले. पुढील सखोल चाचण्यांसाठी नागपूर जिल्ह्यातील अदासा (युजी ते ओसी) आणि मकरधोकडा-थ्री खाणींचे नमुने हैदराबाद येथील प्रगत प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रमाण, शुद्धता आणि आर्थिकदृष्ट्या उत्खननाची व्यवहार्यता निश्चित झाल्यानंतर कंपनी व्यावसायिक उत्खनन व मार्केटिंगचा आराखडा आखणार आहे.
यानंतर कोळसा-केंद्रित कंपनीपासून 'मल्टी-मिनरल' महामंडळाकडे वाटचाल हा पुढील टप्पा असेल. नंतर दुर्मीळ धातूंच्या उत्खननासाठी तांत्रिक भागीदारी, प्रक्रिया-उद्योग आणि जागतिक बाजारपेठेतील नेटवर्किंगवर भर दिला जाईल. यामुळे विदर्भात पूरक उद्योग उभे राहून रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकेल, अशी माहिती उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली.
महानंदी कोलफिल्ड्स लिमिटेड (ओडिशा) आणि साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (छत्तीसगड) येथे लिथियम, व्हॅनेडिअम आदी घटकांच्या शक्यता तपासल्या जात आहेत; झारखंडमध्ये कोळशाच्या राखेतून 'रेअर अर्थ एलिमेंट्स' वेगळे करण्याचे प्रयोग सुरू आहेत. मात्र विदर्भात एकाच वेळी रेनिअम आणि टायटॅनियमचे अंश सापडणे ही दुर्मीळ घटना मानली जात आहे. त्यामुळे देशपातळीवर हा शोध महत्त्वाचा ठरणार आहे.
पोटॅश : बळीराजाचा हिरा
पोटॅश हे शेतीसाठी अत्यावश्यक खनिज असून खतनिर्मितीतील मुख्य घटक मानले जाते. पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, उत्पादन क्षमता सुधारणे आणि जमिनीची सुपीकता टिकवणे यासाठी ते महत्त्वाचे आहे. भारत मोठ्या प्रमाणावर पोटॅश आयात करतो, ज्यावर हजारो कोटींचा खर्च होतो. विदर्भात त्याचे साठे उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना स्वस्त खत मिळू शकेल.
टेल्युरियम : ऊर्जा क्रांतीचा दीपस्तंभ
टेल्युरियम हा आधुनिक सेमीकंडक्टर आणि सौर ऊर्जा तंत्रज्ञानातील कळीचा घटक आहे. 'थिन फिल्म' सोलर पॅनेल्स, मेमरी चिप्स आणि हरित ऊर्जा उपकरणांमध्ये त्याचा वापर होतो. जागतिक ऊर्जा संक्रमणात त्याचे स्थान वाढत आहे. भारताच्या 'नेट झिरो' उद्दिष्टासाठी स्वदेशी टेल्युरियम उपलब्धता अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन आर्थिक व रणनीतिक मूल्य असलेला हा धातू भविष्यात निर्णायक भूमिका बजावणार आहे.
रेनिअम : दुर्मीळतेचा सम्राट
जगातील सर्वाधिक दुर्मीळ धातूंमध्ये गणना होणारा रेनिअम अत्यंत उच्च उत्कलनबिंदूमुळे ओळखला जातो. जेट इंजिन, क्षेपणास्त्रे आणि सुपर-अलॉयज निर्मितीत तो अपरिहार्य मानला जातो. संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी हा रणनीतिक संपत्तीचा भाग आहे. विदर्भात त्याचे अंश सापडणे म्हणजे संरक्षण स्वावलंबनाकडे मोठी झेप असून जागतिक बाजारातही याला प्रचंड आर्थिक मूल्य आहे.
दुर्मीळ खनिजांच्या साठ्यात महाराष्ट्र देशात प्रथम; विदर्भात उत्खननावर भर
'इंडियन ब्युरो ऑफ माइन्स'च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील दुर्मीळ खनिजांच्या साठ्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताच्या एकूण २९ लाख टन खनिज साठ्यापैकी १२ लाख टन (४१ टक्के) साठा एकट्या महाराष्ट्रात आहे, तर गुजरात ११ लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण ११ राज्यांमध्ये हे साठे आढळले असून झारखंडमध्ये याचे प्रमाण सर्वात कमी आहे. या पार्श्वभूमीवर, विदर्भात 'वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड' कोळसा खाणींमधील ओव्हरबर्डनमधून (मातीचा ढिगारा) या खनिजांचा शोध घेत आहे. तसेच, 'कोल इंडिया लिमिटेड'ने नागपूर जवळील रामटेक येथे स्वतंत्र ब्लॉक घेऊन संशोधनास सुरुवात केली आहे. संरक्षण क्षेत्रातील वाढत्या वापरामुळे या १७ प्रकारच्या विशेष धातूंना सध्या जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.
टायटॅनियम : भविष्याचा धातू
पोलादाइतका मजबूत पण वजनाने अत्यंत हलका आणि गंजरोधक असा टायटॅनियम आधुनिक तंत्रज्ञानाचा आधारस्तंभ आहे. इस्रोच्या रॉकेट्सपासून विमान उद्योग आणि वैद्यकीय इम्प्लांट्सपर्यंत त्याचा व्यापक वापर होतो. अवकाश, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रात याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जागतिक स्तरावर त्याला उच्च मागणी असून देशांतर्गत उपलब्धता वाढल्यास आयात खर्च कमी होऊन उच्च तंत्रज्ञान उद्योगांना मोठी चालना मिळेल.