ओडिशातून मध्यप्रदेशात जाणारा २.६ कोटींचा गांजा जप्त, ‘डीआरआय’ची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 19:45 IST2026-01-11T19:45:30+5:302026-01-11T19:45:43+5:30
कूलर आणि ब्लँकेटच्या आड लपवला होता साठा

ओडिशातून मध्यप्रदेशात जाणारा २.६ कोटींचा गांजा जप्त, ‘डीआरआय’ची मोठी कारवाई
नागपूर: अवैध अंमली पदार्थ तस्करीच्या विरोधात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी एक मोठी मोहीम फत्ते केली. ११ जानेवारी रोजी, गुप्त माहितीच्या आधारे सावनेर जवळील भागीमहरी टोल प्लाझा येथे एका ट्रकवर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तब्बल ५२२.१३८ किलो गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत सुमारे २ कोटी ६१ लाख ६ हजार ९०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
तस्करांची अनोखी शक्कल, पण पोलिसांची नजर तीक्ष्ण
एमपी-०४ जीबी ३८५९ या क्रमांकाचा ट्रक ओडिशाहून मध्यप्रदेशच्या दिशेने जात होता. तस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अंमली पदार्थांची बॅग अत्यंत चाणाक्षपणे लपवली होती. ट्रकमध्ये वरच्या बाजूला घरगुती वापराच्या वस्तू जसे की कूलर, पंखे, ब्लँकेट आणि जॅकेट भरलेले होते. वरून पाहिल्यास हा ट्रक सामान्य मालवाहतूक करणारा वाटत होता, मात्र सखोल तपासणी केली असता त्या साहित्याच्या खाली गांजाची मोठी खेप आढळून आली.
‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी तातडीने ट्रकसह सर्व माल जप्त केला असून, आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस कायदा-१९८५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा माल ओडिशातून नक्की कोणाकडून घेण्यात आला आणि मध्यप्रदेशात तो कोणाला पोहोचवला जाणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे आंतरराज्यांतर्गत चालणाऱ्या अंमली पदार्थांच्या रॅकेटला मोठा तडाखा बसला आहे. या कारवाईमुळे सावनेर परिसरात आणि तस्करी करणाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.