साईनगर शिर्डी एक्सप्रेसमधून महाराष्ट्रात येत होता गांजा; ओडिशा, उत्तर प्रदेशातील गांजा तस्करांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 20:10 IST2025-11-09T20:09:17+5:302025-11-09T20:10:49+5:30
Nagpur Ganja Crime: पश्चिम बंगालकडून येणाऱ्या ट्रेनमधून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने यापुर्वी प्रकाशित केल्यानंतर आरपीएफकडून 'ऑपरेशन नार्कोस' सुरू केले गेले.

साईनगर शिर्डी एक्सप्रेसमधून महाराष्ट्रात येत होता गांजा; ओडिशा, उत्तर प्रदेशातील गांजा तस्करांना अटक
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या सुरक्षा दलाने (आरपीएफ) शनिवारी पुरी-साईनगर शिर्डी एक्सप्रेसमध्ये मोठी कारवाई केली. ओडिशातून गांजाचे घबाड घेऊन निघालेल्या ओडिशा तसेच यूपीतील तीन तस्करांना भंडारा-नागपूरच्या दरम्यान धावत्या गाडीत जेरबंद केले. त्यांच्याकडून ५० किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला.
पश्चिम बंगालकडून येणाऱ्या ट्रेनमधून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने यापुर्वी प्रकाशित केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून दपूम रेल्वेच्या आरपीएफकडून 'ऑपरेशन नार्कोस' राबविणे सुरू केले.
विविध ट्रेनच्या कोचमध्ये अंमली पदार्थांची तपासणी करण्यात येते. पुरी-साईनगर शिर्डी एक्सप्रेसमधून गांजाची मोठी खेप महाराष्ट्रात येत असल्याची माहिती आरपीएफच्या गुप्तचर शाखेला शनिवारी मिळाली होती. त्यानुसार, एक विशेष पथक गोंदियातून या गाडीची तपासणी करू लागले.
गाडी भंडारा स्थानक सोडून नागपूरकडे येत असताना कोच नंबर ए-वन आणि ए-टू मध्ये बसलेल्या तीन प्रवाशांचा तपासणी करणाऱ्या पथकाला संशय आला. त्या तिघांना विचारपूस करताच ते गोंधळले आणि उडवाडवीची उत्तरे देऊ लागले.
आरपीएफने त्यांच्याजवळच्या सामानाची तपासणी केली. त्यांच्या बॅगमध्ये आरपीएफच्या जवानांना खाकी वेस्टनात गुंडाळले २८ पाकिटे मिळाली. त्याची तपासणी केली असता त्यात ५० किलो, २५८ गांजा असल्याचे उघडकीस आले.
गांजाची किंमत २५ लाखांपेक्षा जास्त
आरपीएफने नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस, ईतवारी रेल्वे स्थानकावर हा गांजाचा माल आणि आरोपींना रेल्वे पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत २५ लाख, १२ हजार, ९०० रुपये आहे.
या प्रकरणात हाती आलेल्या गांजा तस्करांचे आणखी काही साथीदार आहेत का, त्याची पहाटेपर्यंत चौकशी करून ईतवारी रेल्वे पोलिसांनी आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस) विविध कलमानुसार रविवारी गुन्हा दाखल केला.
अटक करण्यात आलेले आरोपी कोण?
नीलू गौडा (वय १९, रा. सातानाला कोंदला, जि. गंजम, ओडिशा), शुभम गुप्ता (वय २४, रा. दलईपूर, मुगलसराय, जि. चंदौली, उत्तर प्रदेश) आणि अमन गुप्ता (वय २५, रा. आनंद नगर, मुगलसराय, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी गांजाची ही एवढी मोठी खेप कुठून घेतली आणि ती कुणाकडे पोहचवणार होते, त्याचा आता शोध घेतला जात आहे.