महाठग अजित पारसेची अटकपूर्व जामिनासाठी धडपड; सत्र न्यायालयात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 15:47 IST2022-11-23T15:47:08+5:302022-11-23T15:47:22+5:30
वकिलांच्या विनंतीवरून येत्या सोमवारपर्यंत सुनावणी तहकूब

महाठग अजित पारसेची अटकपूर्व जामिनासाठी धडपड; सत्र न्यायालयात अर्ज
नागपूर : उपराजधानीतील महाठग अजित पारसेने स्वत:ला अटकेपासून वाचविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. याकरिता त्याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
पारसेच्या अर्जावर मंगळवारी न्या. जी. पी. देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, त्यांनी वकिलांच्या विनंतीवरून येत्या सोमवारपर्यंत सुनावणी तहकूब केली. सरकारने पारसेला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास जोरदार विरोध केला आहे. पारसेवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पारसेला अटक करणे आवश्यक आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. दुसऱ्या बाजूने पारसेचे वकील ॲड. राजू कडू यांनी सरकारचे मुद्दे फेटाळून लावले आहेत. पारसेवरील आरोप निराधार असून त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.
अजित पारसेने डॉ. राजेश मुरकुटे यांना होमिओपॅथी महाविद्यालयासाठी पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधी रुपयाचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली आणि सीबीआयची कारवाई थांबविण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांनी गंडवले आहे, तसेच वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनीष वझलवार यांची कोट्यवधी रुपयांचा सीएसआर निधी मिळवून देण्यासाठी १८ लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणात पारसेविरुद्ध कोतवाली आणि अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु, त्याला अद्याप एकाही गुन्ह्यात अटक झाली नाही. तो सध्या आजारपणामुळे रुग्णालयात भरती आहे.