बारावी पेपरफूट प्रकरणात आणखी चार आरोपी अटकेत, मुख्याध्यापक-कॉलेज संचालकाचादेखील समावेश

By योगेश पांडे | Updated: February 27, 2026 20:25 IST2026-02-27T20:23:27+5:302026-02-27T20:25:01+5:30

पेपरफूटीची पाळेमुळे खोलवर रुतलेली : अनेक कोचिंग क्लासेसमध्ये फॉरवर्ड झाली होती प्रश्नपत्रिका

Four more accused arrested in 12th paperfoot case, principal-college director also included | बारावी पेपरफूट प्रकरणात आणखी चार आरोपी अटकेत, मुख्याध्यापक-कॉलेज संचालकाचादेखील समावेश

Four more accused arrested in 12th paperfoot case, principal-college director also included

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
बारावीच्या पेपरफूट प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अटकेतील एकूण आरोपींची संख्या आठ इतकी झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ कोचिंग क्लास संचालकच नव्हे तर आता कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक व महाविद्यालय संचालकदेखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. सद्यस्थितीतील चौकशीच्या स्थितीनुसार जयताळा येथील कनिष्ठ महाविद्यालयातील संचालकाने पेपर फॉरवर्ड केल्याची बाब समोर आली आहे. या एकूण प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुतलेली असून अनेक कोचिंग क्लासेस व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उत्तरांसह फॉरवर्ड झाली होती.

जयताळा येथील विद्यासाधना शाळेचा संचालक संदीप बाबूराव सरटकर (४६, जयताळा), विशाखा कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक प्रदीप भैय्यालाल जांगडे (४३, आराधना कॉलनी, नारा मार्ग), एज्युकेशन ॲकेडमी या कोचिंग क्लासचा संचालक मनिष शंभरकर (४६, गोदाम ले आऊट, त्रिमूर्तीनगर) व दिनेश कोटांगळे (३७, कबीरनगर, नारी मार्ग) अशी अटकेतील आणखी आरोपींची नावे आहे.

सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर १८ फेब्रुवारी रोजी एका विद्यार्थिनीच्या मोबाइलमधील व्हाॅट्सॲप ग्रुपवर परीक्षा सुरू हाेण्यापूर्वीच रसायनशास्त्राचा पेपर आलेला हाेता, तसेच त्याच ग्रुपवर प्रश्नांची उत्तरेसुद्धा आलेली हाेती. विद्यार्थिनींच्या मोबाइलमध्ये १६ फेब्रुवारी रोजी झालेला भौतिकशास्त्राचाही पेपर सापडला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल दहीफळे यांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी निशिकांत मूल (४५, मानकापूर) व फरहान अख्तर (१९, कामगारनगर), एक्सेलेन्ट अकॅडमीचा संचालक मुस्तफा खान मुनीर खान (४२, भानखेडा) व जुनेद मोहम्मद अब्दुल जावेद (२४, हसनबाग) यांना अटक केली होती. मुस्तफा व जुनेद यांना दिनेश कोटांगळे (३७, कबीरनगर, नारी मार्ग) याने व्हॉट्सअपद्वारे रसायनशास्त्र व गणिताचा पेपर फॉरवर्ड केल्याचे तांत्रिक चौकशीतून समोर आले. सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्याध्यापकाने दिली रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका

कोटांगळेला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली. कोटांगळेला त्याचा परिचयाचा आरोपी अल्ताफ गोडिल याने बारावीचा पेपर परीक्षेअगोदर मिळू शकतो का अशी विचारणा केली होती. दिनेशने सूरज सहारे नावाच्या व्यक्तीला फोन केला असता त्याने मनीष शंभरकर याच्या मार्फत प्रदीप जांगडेला भेटायला सांगितले. दिनेश व अल्ताफ हे प्रदीप जांगडेला भेटले. प्रदीपने दिनेशला रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका व उत्तरे दिली. दिनेशने ते अल्ताफला व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केले. २१ फेब्रुवारी रोजी गणिताचा पेपर होता. तोदेखील जांगडे व दिनेशने अल्ताफ व मुस्तफा मुनीर यांच्या मोबाईलवर पाठविला होता.

महाविद्यालय संचालकाची ‘लिंक’ महत्त्वाची 

पोलिसांनी मुख्याध्यापक प्रदीप जांगडे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पेपर संदीप सरटकरने पाठविल्याचे सांगितले. संदीप सरटकर हा विद्यासाधना शाळा चालवितो. त्याच्याकडे या प्रश्नपत्रिका नेमक्या कुठून आल्या. त्याने केंद्रावरून अगोदरच प्रश्नपत्रिका काढली व बोर्डातून प्रश्नपत्रिका मिळाली याची पोलीस चौकशी करत आहे. सरटकर या संपूर्ण साखळीतील महत्त्वाचा दुवा असून त्याच्या माध्यमातून आणखी महत्त्वाची माहिती भेटू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title : 12वीं पेपर लीक मामले में चार और गिरफ्तार, प्रधानाध्यापक-कॉलेज संचालक भी शामिल

Web Summary : 12वीं कक्षा के पेपर लीक मामले में प्रधानाध्यापक और कॉलेज संचालक सहित चार और लोगों को गिरफ्तार किया गया है। जांच से पता चला है कि कोचिंग क्लास और छात्रों को परीक्षा से पहले उत्तरों के साथ लीक हुए प्रश्न पत्र मिल रहे थे।

Web Title : Four more arrested in 12th grade paper leak case.

Web Summary : Four more individuals, including a principal and college director, have been arrested in connection with the 12th-grade paper leak case. Investigations reveal a widespread network involving coaching classes and students receiving leaked question papers with answers before exams.