नागपूरच्या चार वकिलांची हायकोर्ट न्यायमूर्तिपदी नियुक्तीची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:29 IST2025-08-20T15:26:54+5:302025-08-20T15:29:24+5:30
Nagpur : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा केंद्र सरकारला प्रस्ताव

Four lawyers from Nagpur recommended for appointment as High Court judges
नागपूर : कॉलेजियमने मंगळवारी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्ताव सादर करून नागपूर येथील अॅड. मेहरोज अश्रफ खान पठाण, अॅड. राज दामोदर वाकोडे, अॅड. नंदेश शंकरराव देशपांडे व अॅड. रजनीश रत्नाकर व्यास, या चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली. केंद्र सरकारने ही शिफारस मंजूर केल्यानंतर चारही वकील अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्त होतील.
अॅड. मेहरोज खान पठाण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये राज्य सरकारचे वकील आहेत, तर अॅड. नंदेश देशपांडे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया (केंद्र सरकार) आहेत. अॅड. राज वाकोडे व अॅड. रजनीश व्यास खासगी वकिली करतात. या चारही विधिज्ञांना वकिली व्यवसायाचा दीर्घ अनुभव आहे. यादरम्यान त्यांनी संवैधानिक, दिवाणी, फौजदारी इत्यादी प्रकरणे यशस्वीपणे हाताळली आहेत. त्यांची आतापर्यतची यशस्वी कारकीर्द लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांना न्यायमूर्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण १४ वकिलांची शिफारस
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूर येथील चौघांसह एकूण १४ वकिलांची अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. इतर वकिलांमध्ये अॅड. संदेश पाटील, अॅड. श्रीराम सिरसाट, अॅड. रणजीतसिंह राजा भोसले, अॅड. आशिष चव्हाण, अॅड. फरहान दुबाश, अॅड. आबासाहेब शिंदे, अॅड. हितेन वेणेगावकर, अॅड. अमित जामसांदेकर, अॅड. वैशाली पाटील-जाधव व अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने या सर्व वकिलांची मंगळवारी मुलाखत घेतली. या वकिलांची अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयाला शिफारस केली होती.