नागपुरात अन्न पुरवठा विभागाचा घोळ ! गरिबांचा तांदूळ हिसकावून कटिंग, पॉलिश करून माफियांचे मार्केट जोरात
By नरेश डोंगरे | Updated: October 15, 2025 20:03 IST2025-10-15T20:02:25+5:302025-10-15T20:03:57+5:30
भ्रष्ट यंत्रणेचे बेमालूम संगणमत : कंची मारलेला तांदूळ पोहचतो बाजारात

Food supply department in Nagpur is in chaos! The mafia is busy cutting and polishing rice from the poor and increasing its market share.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमतने आज 'अन्न पुरवठा विभागातील घोळ बाहेर काढून 'गरिबांच्या हक्काचे अन्न ओरबडतेय भ्रष्ट यंत्रणा' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली. अनेकांनी या संबंधाने प्रत्यक्ष भेटून, फोन करून सरकारी धान्य वितरण प्रणालीला भ्रष्ट यंत्रणेने कशी किड लावली, त्याबाबतचे 'काळे कारनामे' सांगितले. त्यानुसार, गरिबाच्या हक्काच्या रेशनमधून कमी केलेले धान्य, खास करून तांदूळ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेशन माफिया कटिंग, पॉलिश करून बाजारात आणतात. ते व्यापाऱ्यांच्या मदतीने दामदुप्पट भावाने विकून त्यातून महिन्याला कोट्यवधी रुपये गिळतात. धक्कादायक म्हणजे, वितरण प्रणालीतील ही भ्रष्ट यंत्रणा सरकारचीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बदनामी करीत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
माहितगार सूत्रांनुसार, एकीकडे गोरगरिबांना वितरित करण्यासाठी आलेला चांगल्या प्रकारचा तांदूळ छू मंतर होतो. त्या बदल्यात अनेक स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ पोहचतो. हा निकृष्ट तांदुळही अर्थातच 'काळे कारनामे' करणाऱ्यांकडूनच वितरण प्रणालीत घुसविण्यात आलेला असतो. याबाबत दुकानदारांनाही आवाज उचलण्याची मुभा नसते. दरम्यान, खाण्यासारखा नसलेला हा तांदूळ दुकानदारांच्या माध्यमातून वितरित करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. अशा प्रकारे गोरगरिबांच्या पोटावर झारीतील शुक्राचार्य लाथ मारत असल्याची माहिती आहे.
तांदळाचे 'काळेबेरे, लाखोंचे वारेन्यारे'
शहरात राशन वितरण प्रणाली पोखरून टाकणाऱ्यांपैकी विकी कुंगनी हिवरीवाला, सोनू ठान कामठीवाला, हसनबागचा बबलू आणि जरीपटक्यातील रवी चांदनी हे ते प्रमुख राशन माफिया होय. भ्रष्टाचाऱ्यांचे लाडके असलेल्या या माफियांकडे 'ग्रेन कलेक्शन'ची जबाबदारी आहे. दुकानदारांकडून कंची मारलेले आणि गल्लीबोळात फिरून अल्प किंमतीत विकत घेतलेल्या तांदळाचे 'काळेबेरे' करतात अन् त्यातून रोज लाखोंचे वारेन्यारे करतात.
सरकारचीही होते नाहक बदनामी
निकृष्ट तांदूळ पाहून गोरगरिब जनतेच्या मनात सरकार विषयी भलतीच भावना तयार होते. असे निकृष्ट धान्य पुरवून सरकार आमची थट्टा करीत असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण होते. दुसरीकडे हे 'काळेबेरे' करून मध्येच गायब झालेल्या चांगल्या प्रतिच्या तांदळाला 'आपल्या माणसांच्या' गोदामात पोहवले जाते. येथून तो तांदूळ बाजारात येतो आणि त्याची सर्रास दामदुप्पट, तिप्पट भावाने विक्री करून लाखोंचा मलिदा गिळंकृत केला जातो.