नागपुरला पोहोचले नाही विमान ! आंतरराष्ट्रीय फ्लाइट रद्द, दाट धुक्यामुळे शारजाह – नागपूर विमानसेवा रद्द
By आनंद डेकाटे | Updated: November 21, 2025 19:03 IST2025-11-21T18:56:15+5:302025-11-21T19:03:14+5:30
Nagpur : एअर अरेबियाची शारजाह–नागपूर फ्लाइट जी ९ -४१५ गुरुवारी रात्री ११ वाजता शारजाहहून उड्डाण घेऊन शुक्रवारी पहाटे ३.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे पोहोचते.

Flight did not reach Nagpur! International flights cancelled, Sharjah-Nagpur flight cancelled due to dense fog
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये गुरुवारी उशिरा रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत दाट धुके पसरल्यामुळे शारजाहसह यूएईतील इतर शहरांमधून सुरू असलेल्या अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या. यात शारजाह–नागपूरविमानसेवाही समाविष्ट होती. ही फ्लाइट शुक्रवारी पहाटे नागपूरला पोहोचू शकली नाही. त्यामुळे नागपूरहून शारजाहकडे जाणारी परतीची फ्लाइटही उपलब्ध होऊ शकली नाही.
एअर अरेबियाची शारजाह–नागपूर फ्लाइट जी ९ -४१५ गुरुवारी रात्री ११ वाजता शारजाहहून उड्डाण घेऊन शुक्रवारी पहाटे ३.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे पोहोचते. त्यानंतर परतीची जी ९ -४१६ नागपूर–शारजाह फ्लाइट पहाटे ४.२५ वाजता शारजाहसाठी निघते. परंतु शारजाहहून फ्लाइट न आल्याने येथूनही उड्डाण होऊ शकले नाही. मात्र, गुरुवारी रात्रीच परिस्थिती लक्षात घेऊन एअर अरेबियाने प्रवाशांना मोबाईलवर संदेश पाठवून फ्लाइट रद्द झाल्याची पूर्वसूचना दिली होती.
यूएईमध्ये जारी झाला रेड अलर्ट
दाट धुक्यामुळे यूएईच्या नॅशनल सेंटर ऑफ मेटिओरोलॉजी (एनसीएम) यांनी शारजाहमधील अल काराय, अबूधाबीतील जायद आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुबईतील अल लिसैली, अल कुदरा आणि अबूधाबीतील सेह सुहैब व अल अजबान या भागांसाठी रेड आणि यलो अलर्ट जारी केला होता. अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहनांसाठी वेगमर्यादा ठरविण्यात आल्या आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या.
इंडिगोची वेळेपुढे ‘गती’ हरवली
रेल्वेप्रमाणेच आता विमानांच्या उशिराचा क्रमही सुरू झाला आहे. शुक्रवारी नागपूरला येणाऱ्या इंडिगोच्या बहुतेक फ्लाइट उशिरा आल्या. वारंवार फ्लाइट उशिरा येत असल्याने सर्वाधिक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
शुक्रवार सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून येणारी इंडिगोची फ्लाइट सुमारे अर्धा तास उशिरा नागपूरला पोहोचली. त्याचप्रमाणे इंदोरहून येणारी फ्लाइटदेखील अर्धा तास उशिरा सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी आली. हैदराबादहून येणारी फ्लाइटही उशीरा होती, तर अहमदाबादहून येणारी फ्लाइटदेखील अर्धा तास उशिरा पोहोचली. मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांनी पुण्याहून येणारी फ्लाइटदेखील विलंबाने आली. या संदर्भात इंडिगोच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ‘तांत्रिक कारणांमुळे उशीर झाला’ असे सांगितले. मात्र, वारंवार फ्लाइट उशिरा होत असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढत आहे.