राज्यातील पहिलाच प्रयोग : नागपुरातील नरसाळा गावाचे होणार ड्रोनद्वारे भूमापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:20 IST2018-10-28T01:18:03+5:302018-10-28T01:20:41+5:30
नागपूर महानगरपालिकेत नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेल्या नरसाळा या गावाचा सिटी सर्वे (भूमापन) अत्याधुनिक ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मनपा क्षेत्रातील एखाद्या गावाचे सर्वेक्षण अशा प्रकारे होणार आहे हे विशेष.

राज्यातील पहिलाच प्रयोग : नागपुरातील नरसाळा गावाचे होणार ड्रोनद्वारे भूमापन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेत नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेल्या नरसाळा या गावाचा सिटी सर्वे (भूमापन) अत्याधुनिक ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मनपा क्षेत्रातील एखाद्या गावाचे सर्वेक्षण अशा प्रकारे होणार आहे हे विशेष.
नागपूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात हुडकेश्वर (बु) व नरसाळा या गावांचा समावेश २०१३ साली करण्यात आला. मनपा हद्दीत समाविष्ट झाल्याने सदर गावांचा सिटी सर्वे करण्याची मागणी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीस अनुसरून जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम, भूमी अभिलेख संचालक, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त रवींद्र ठाकरे आणि नागपूर विभागाचे भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब काळे यांच्या संयुक्त पुढाकाराने महाराष्ट्र रिमोट सेन्सींग अप्लीकेशन सेंटर नागपूरचे संचालक सुब्रता दास यांनी अत्याधुनिक ड्रोनद्वारे अतिशय जलद गतीने नगर भूमापनाचे मोजणी काम करण्यासाठी मौजा नरसाळा या गावाची पथदर्शी प्रकल्पांतर्गत निवड करून महाराष्ट्रात पहिल्यांदाच ड्रोन सर्वे करण्यास तयारी दर्शविली आहे.
पथदर्शी प्र्रकल्पाअंतर्गत नरसाळ्याचे ड्रोनद्वारे भूमापनाचे काम येत्या सोमवारपासून सुरु करण्यात येत आहे. त्याकरिता नरसाळा या गावाच्या हद्दीतील मिळकतधारकांनी आपापल्या मिळकतीच्या हद्दी जागेवर दाखवाव्यात, असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नागपूर जी.बी. डाबेराव आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख (ग्रामीण) महेश राजगुरू यांनी सांगितले आहे.