बेरोजगारांच्या नावावर ‘फर्म्स’, बँक खात्यांचा उपयोग ‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये; आंतरराज्यीय रॅकेटचा भंडाफोड

By योगेश पांडे | Updated: November 10, 2025 19:55 IST2025-11-10T19:50:06+5:302025-11-10T19:55:54+5:30

२३ आरोपींना अटक : बँक खात्यातून ऑनलाइन गेमिंग, बेटिंग, अवैध सावकारी, हवालाचा व्यवहार

'Firms' in the name of unemployed people, bank accounts used in 'online frauds'; Inter-state racket busted | बेरोजगारांच्या नावावर ‘फर्म्स’, बँक खात्यांचा उपयोग ‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये; आंतरराज्यीय रॅकेटचा भंडाफोड

'Firms' in the name of unemployed people, bank accounts used in 'online frauds'; Inter-state racket busted

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढून स्वयंरोजगाराच्या नावाखाली त्यांच्या नावावर फर्म्स उघडून बँक खात्यांच्या माध्यमातून ऑनलाइन गोरखधंदा करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात २३ आरोपींना अटक केली आहे. संबंधित फर्म्स व बँक खात्यातून ऑनलाइन गेमिंग, बेटिंग, अवैध सावकारी, हवालाचा व्यवहार सुरू होता, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.

वैभव नूरसिंग बघेल (२७, आर्यनगर, कोराडी), सुमित राजेश पटले (२३, नवरगाव, गोंदिया), रोहित हरीश कांबळे (३९, बजरंगनगर, मानेवाडा), सोहेल अब्दुल सलीम खान (३८, मानकापूर), अश्विन सत्येंद्रकुमार भार्गव (१८, नरसिंगपूर), अनिलकुमार सर्वेश्वर दास (बालेश्वर, मध्य प्रदेश), सुशांत जगबंधू राऊत (कुसनपूर, केंद्रपाडा, मध्य प्रदेश), श्रेयस संजय मस्के (शांतीनगर), पंकज शेखर टेटे (पाचपावली), शेख मैदुल शेख शफीउल रहेमान (हरदासपूर, जाजपूर), अझहर शेख सिराज शेख, (पिंपरी-चिंचवड, पुणे), पंकज श्रीरामसिंग विश्वकर्मा (विदिशा, मध्य प्रदेश), अक्षय अनिल काजडे (पिंपरी-चिंचवड, पुणे), अभिषेक धनराज गुप्ता (फुकटनगर, नागपूर), दीपक ज्ञानचंद्र विश्वकर्मा (भोपाळ, मध्य प्रदेश), विजय रामचंद्र नरोटे (जेल रोड, नाशिक), सूरजितसिंग महेंद्रसिंग बेदी (दीपकनगर, नागपूर), सागर गोविंद बागडे (नारी रोड, नागपूर), चंद्रकांत भानुदास शिरोळे (शिंदेगाव, नाशिक), राहुल संजय जुनी (अमरावती), देवेश महेश वजीर (जवाहर गेट, अमरावती), अमर संजयराव वाघोळकर (नीळकंठ चौक, अमरावती), आशिष नंदकिशोर बसेडिया (शांतीनगर, नरसिंगपूर, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.

असे आहे प्रकरण

दीपक घनश्याम गायधने (२८, नागराज चौक, गोंदिया) हा नोकरीच्या शोधात असताना मित्राच्या माध्यमातून त्याची सुमित पटलेसोबत भेट झाली. दीपकने सुमितला नोकरी पाहण्यास सांगितले. सुमित व रोहितने इतर काही आरोपींसोबत त्याची भेट घेतली. तू व्यवसायातून नफा कमवू शकतो, असे त्याला म्हणत नोंदणी व बँक खाते उघडण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड घेतले. आरोपींनी बँक ऑफ बडोदा, हिंगणा येथे त्याचे बँक खाते उघडले. तसेच त्याच्या नावावर दीपक एंटरप्रायजेस या फर्मची सरकारी नोंदणी केली. त्यांनी दीपकच्या नावावरच सिमकार्ड घेतले व तसेच बँक खात्याचे तपशील स्वत:जवळच ठेवले. दीपक हा आरोपी रोहितकडेच राहत होता व तिथे आणखी बेरोजगार मुलेदेखील येत होती. त्यांच्याकडूनदेखील अशीच कागदपत्रे घेऊन फर्म उघडल्याचे दीपकला कळाले.

अवैध व्यवसायांसाठी फर्म व खात्यांचा वापर

आरोपी बेरोजगारांच्या नावाने उघडलेल्या फर्म व बँक खात्यांच्या माध्यमातून ऑनलाइन बेटिंग, गेमिंग, अवैध सावकारी, हवाला हे व्यवसाय करत होते. आरोपींनी १३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत एकट्या दीपकच्या खात्यातून १.७३ कोटींचे व्यवहार केले होते. त्याच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने याचे खोदकाम केले असता आंतरराज्यीय टोळीचा भंडाफोड झाला. आरोपींनी आणखी तरुणांचीदेखील अशीच फसवणूक केल्याचे चौकशीतून समोर आले. त्या बँक खात्यांवरील रकमा गोठविण्यात आल्या आहेत.

राज्यभरात ८२ तक्रारींची नोंद

संबंधित बँक खात्याशी निगडित गुन्ह्यांबाबत देशभरात ८२ तक्रारींची नोंद असल्याची माहिती ‘एनसीसीआरपी’च्या माहितीतून समोर आली. त्यातील एकट्या १३ तक्रारी महाराष्ट्रातील आहेत.

बीएमडब्लू कार अन् ५८ चेकबुक

आरोपी बेकायदेशीर कृत्यांतील पैशांतून बीएमडब्लू कार घेऊन फिरत होते. त्यांच्याकडून ती कार, तसेच ८ आस्थापना नोंदणी प्रमाणपत्रे, ९ किराया पत्रे, रबरी शिक्के, बॅनर्स, विविध आधारकार्ड, ५८ चेकबुक्स, ५० सिमकार्ड्स, ३८ स्मार्टफोन्स जप्त करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, सचिन मते, नवनाथ देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title : अंतर्राज्यीय गिरोह का भंडाफोड़: बेरोजगारों का उपयोग ऑनलाइन धोखाधड़ी, फर्मों, खातों के लिए।

Web Summary : पुलिस ने बेरोजगार युवाओं का शोषण कर ऑनलाइन धोखाधड़ी के लिए फर्म और बैंक खाते खोलने वाले एक अंतरराज्यीय गिरोह का भंडाफोड़ किया। 23 गिरफ्तार। खातों का उपयोग गेमिंग, सट्टेबाजी और हवाला के लिए किया गया। देशभर में 82 संबंधित शिकायतें दर्ज।

Web Title : Interstate racket busted: Unemployed used for online fraud, firms, accounts.

Web Summary : Police busted an interstate racket exploiting unemployed youth by opening firms and bank accounts for online fraud. 23 arrested. Accounts used for gaming, betting, and hawala. 82 related complaints registered nationwide.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.