धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
By योगेश पांडे | Updated: January 14, 2026 18:38 IST2026-01-14T18:37:03+5:302026-01-14T18:38:49+5:30
Nagpur : नातेसंबंधांमध्ये वितुष्ट आल्यानंतर ‘इगो’ दुखावल्या गेल्यानंतर अनेकदा लोक खालच्या थराला जात सैतानी प्रवृत्तीने वागतात.

Father in Nagpur becomes a devil, kills daughter to prevent wife from taking custody
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नातेसंबंधांमध्ये वितुष्ट आल्यानंतर ‘इगो’ दुखावल्या गेल्यानंतर अनेकदा लोक खालच्या थराला जात सैतानी प्रवृत्तीने वागतात. असाच प्रकार नागपुरात घडला असून पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून चक्क पोटच्या मुलीची बापाने हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शेखर कृष्णराव शेंदरे (४६, सरोदेनगर) असे सैतान बापाचे नाव आहे. तर धनश्री (८) ही निष्पाप मृतक चिमुकली आहे. शेखर हा सरोदेनगरात भाड्याच्या घरी राहतो. त्याच्यासोबत आई कुसुमताई, लहान भाऊ उमेश (४५) हेदेखील राहतात. शेखरचा पत्नी शुभांगीसोबत वाद सुरू होता. वाद विकोपाला गेल्याने शुभांगीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र शेखरने मुलगी धनश्रीला स्वत:कडेच ठेवून घेतले होते. शुभांगी वारंवार शेखरला तिचा ताबा मागत होती. मात्र शेखर त्याला नकार देत होता व त्यावरून वाद घालत होता.
कायद्याच्या मार्गाने धनश्रीचा ताबा शुभांगीकडेच जाईल याची त्याला कल्पना आली होती. मात्र या प्रकारामुळे त्याचा ‘इगो’ दुखावल्या गेला होता. त्यातूनच त्याच्या डोक्यात सैतान शिरला. बुधवारी पहाटे शेखर लवकर उठला व पावणेसहा वाजताच्या सुमारास त्याने झोपेत असलेल्या धनश्रीच्या छातीत चाकूने वार केले. धनश्रीने वेदनेमुळे किंकाळ्या फोडल्या. तिचा आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्यांनी धाव घेतले. रक्तबंबाळ धनश्रीला पाहून त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली. शेखरची आई व भाऊ उमेश हे तातडीने धनश्रीला वाठोडा पोलीस ठाण्यात व तेथून मेडिकल इस्पितळात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान धनश्रीचा मृत्यू झाला. शेखरच्या आईच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या प्रकारानंतर मुलीची आजी व आईला मोठा धक्का बसला आहे. ऐन मकरसंक्रांतीच्या सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातदेखील हळहळ व्यक्त करण्यात येत होती.