बाप आणि आजोबाच निघाले हैवान ! १२ वर्षीय चिमुरडीसोबत भयावह घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:00 IST2025-09-03T18:49:47+5:302025-09-03T19:00:34+5:30
खात येथील प्रकार : पीडिता ही गतिमंद, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Father and grandfather turned out to be beasts! Horrifying incident with 12-year-old girl
लोकमत न्यूज नेटवर्क
खात : उन्हाळ्याच्या सुटीत व त्यानंतर शाळेला सुटी असल्यावर घरी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीवर तिच्या बापासह आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याचा केल्याचा प्रकार अरोली (ता. मौदा) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खात येथे घडला असून, मानकापूर (नागपूर) पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, ती १२ वर्षीय पीडिता नागपुरातील निवासी शाळेत शिकत असल्याने तिच्या मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला.
रमेश धनराज खोडके (३९) व धनराज कवडू खोडके (७५) दोघेही रा. खात, ता. मौदा अशी आरोपींची नावे आहेत. पीडिता ही तिच्या आईऐवजी वडिलांकडे राहात असून, ती गतिमंद असल्याने नागपुरातील गतिमंदांच्या निवासी शाळेत शिक्षण घेते. रमेशला दारूचे व्यसन असून, त्याने तीन लग्न केले. मात्र, एकही पत्नी त्याच्याजवळ राहात नसल्याने तो व त्याचे वडील दोघेच राहतात.
ती उन्हाळ्याच्या सुटीत एप्रिल २०२५ मध्ये नागपूरहून खात येथे आली होती. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या काळात वडील, आजोबा या दोघांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ती शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापिकेला संशय आला आणि त्यांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली. त्यामुळे प्रकरण उघड झाले. मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४ (२) (क) (म), ६५ (२), ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे सहकलम ४, ६ अन्वये गुन्हा नोंदविला. मानकापूर पोलिसांच्या सूचनेवरून अरोली (ता. मौदा) पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध याच कलमान्वये गुन्हा नोंदवून दोघांना ताब्यात घेतले आहे.
प्रश्नोत्तरी बयाण
ती शिक्षण घेत असलेली शाळा मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. मुख्याध्यापिकेकडून तक्रार अर्ज प्राप्त होताच मानकापूर पोलिसांसमोर पीडितेचे बयाण नोंदविण्याची समस्या निर्माण झाली होती. मुख्याध्यापिकेने तिला विश्वासात घेऊन काही प्रश्न विचारले. तिनेही त्या प्रश्नांची उत्तरे देत घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. त्यामुळे पोलिसांनी तिचे बयाण प्रश्नोत्तरी स्वरूपात नोंदवून घेतले आणि अरोली पोलिसांना कळविले. अरोली पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला पाठविले. दोघांचेही वैद्यकीय तपासणी अहवाल व आवश्यक पुरावे सीलबंद मागविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक एस. एस. सोनवाने यांनी दिली.
भेटणे व बोलण्यास मज्जाव
आरोपी धनराज खोडके याचे खात येथे घराला लागूनच छोटे दुकान आहे. त्या दोघांनी दुकानातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने बयाणात सांगितले. ती गावाला घरी आल्यानंतर वडील व आजोबा तिला कुणाशी बोलू देत नव्हते व कुणाला भेटूदेखील देत नव्हते. दोघेही तिच्यावर सतत नजर ठेवून असायचे. तिला एकटे कुठेही जाऊ देत नव्हते, अशी माहिती तिच्या खात येथील घराशेजारी राहणाऱ्या अनेकांनी दिली.