सृष्टीची भरारी

By Admin | Updated: June 9, 2015 02:53 IST2015-06-09T02:53:41+5:302015-06-09T02:53:41+5:30

दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील तणावात असल्याचे दिसून येते. खेळायला जायचे नाही, टीव्ही

The fate of the world | सृष्टीची भरारी

सृष्टीची भरारी

मागासवर्गीयांमधून प्रथम : तणाव न घेता केला अभ्यास
नागपूर : दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील तणावात असल्याचे दिसून येते. खेळायला जायचे नाही, टीव्ही पाहायचा नाही, अशी बंधने लावली जातात. अभ्यास करायला वेगळी खोली देण्यात येते व सामाजिक आयुष्यापासून वर्षभर दूरच ठेवण्यात येते. परंतु कर्तृत्व असेल तर यापैकी एकही गोष्ट न करता सहज सर्वांमध्ये राहूनदेखील यश मिळविता येते. कुठलाही तणाव न घेता अगदी मनमोकळेपणे अभ्यास करून सृष्टी वसंत ढोबळे या विद्यार्थिनीने ९८ टक्के गुण प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे ती मागासवर्गीयांमधून विभागातून प्रथम आली आहे.
सोमवारी क्वॉर्टर परिसरात राहणारी सृष्टी ही प्रेरणा कॉन्व्हेंट येथील विद्यार्थिनी आहे. घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानादेखील घरच्यांनी तिच्या अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. विज्ञानामध्ये जास्त आवड असणाऱ्या सृष्टीने अगदी बारीकसारीक बाबींचा सखोल अभ्यास केला; सोबतच भाषेसारख्या विषयांकडेदेखील तिने सारखेच लक्ष दिले. याचाच परिणाम म्हणून तिला ९८ टक्के गुण प्राप्त होत असताना संस्कृतसारख्या विषयात चक्क पैकीच्या पैकी गुण प्राप्त झाले.
वर्षभर मी नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला. त्यामुळे कधीही तणाव आलाच नाही. अगदी फार वेळवगैरे अभ्यास न करता दर्जावर जास्त भर दिला. अभ्यास करण्यासाठी वेगळी खोलीवगैरे नव्हतीच.
एकत्र कुटुंब असल्यामुळे सर्वांमध्ये बसूनच अभ्यास केला. अनेकदा तर टीव्हीवरील कार्यक्रम पाहतदेखील गणित सोडविल्याचे तिने सांगितले. सृष्टीला पुढे जाऊन वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे. सृष्टीचे वडील वसंत ढोबळे हे ‘लोकमत’ समूहाचे कर्मचारी असून, आई नीलिमा या गृहिणी आहेत. मुलीच्या या यशामुळे त्यांच्या आनंदाला तर पारावाराच राहिला नव्हता व त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रूंच्या माध्यमातून भावना व्यक्त होत होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: The fate of the world