गाईमुळे प्राणघातक अपघात, दहा लाख रुपयाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 22:48 IST2020-02-14T22:47:01+5:302020-02-14T22:48:08+5:30
मोकाट गाईमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने १० लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

गाईमुळे प्राणघातक अपघात, दहा लाख रुपयाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोकाट गाईमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने १० लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार, वाहतूक विभाग व महानगरपालिका यांना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
सिमरन रामखिलनानी असे याचिकाकर्त्या पत्नीचे नाव आहे. त्यांचे पती रामकुमार (४६) हे २० जुलै २०१८ रोजी स्कूटर चालवत असताना गिट्टीखदान रोडवर एक मोकाट गाय अचानक आडवी आली. त्यांच्या स्कूटरची गाईला धडक बसली. त्यामुळे रामकुमार रोडवर कोसळून गंभीर जखमी झाले. २६ जुलै रोजी मेयो रुग्णालय येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते जरीपटका येथे किराणा दुकान चालवीत होते. त्यावर त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण अवलंबून होते. रामकुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीत जगावे लागत आहे. त्यांना अल्पवयीन मुलगी व मुलगा आहे. कायद्यानुसार मोकाट जनावरामुळे अपघात झाल्यास जबाबदार प्राधिकरणाने भरपाई देणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका व वाहतूक विभागाला निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, सिमरन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्तीतर्फे अॅड. शिल्पा गिरटकर यांनी कामकाज पाहिले.