शेतकरी आंदोलनामुळे वर्धा मार्ग जाम, हजारो नागरिकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 20:47 IST2025-10-28T20:47:28+5:302025-10-28T20:47:54+5:30
दुपारपासूनच वाहतुकीचा खोळंबा : पोलिसांच्या नियोजनाचे वाजले तीनतेरा

Farmers' protest blocks Wardha road, thousands of citizens affected
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी विविध मागण्यांसाठी शेतकरी मोर्चा धडकला आणि त्यामुळे वर्धा मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली. नागपुरातील बाहेर जाणाऱ्या व वर्धा-चंद्रपूरहून नागपुरात येणाऱ्या हजारो नागरिकांचा याचा मोठा फटका बसला. दुपारपासून ते रात्रीपर्यंत वाहतूक खोळंबल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आणि त्यांना अकारण मन:स्ताप सहन करावा लागला. दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचेदेखील तीनतेरा वाजल्याचे दिसून आले. या कोंडीत काही रुग्णदेखील अडकल्याची माहिती आली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होईल अशी अपेक्षा अगोदरपासूनच होती. त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी सकाळपासूनच ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. तसेच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत होती. त्यानंतर हळूहळू वर्धा येथून शेतकरी आंदोलक मोर्चा बुटीबोरी व तेथून पुढे पोहोचू लागले.
त्यामुळे वर्धा मार्गावर वाहतूकीचा वेग संथ झाला. दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक जामठ्याच्या अगोदर असलेल्या कापूस संशोधन केंद्राजवळील आंदोलनस्थळाजवळ शेतकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. याचा फटका वाहतूकीला बसला. काही मिनिटांतच शेकडो वाहने कोंडीत अडकली. त्यानंतर कोंडी वाढतच गेली व अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. आंदोलक समृद्दी महामार्गावर पोहोचू नये यासाठी पोलीसांनी समृद्धीच्या आरंभबिंदूकडे जाणारा मार्गही पूर्णतः बंद केला होता.
बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना मन:स्ताप
वर्धेसह, चंद्रपूर, हैदराबादकडे जाणारी व तेथून येणारी वाहतूक पूर्णत: खोळंबली होती. बुटीबोरी ते जामठा रस्ता संपूर्णपणे आंदोलनामुळे जाम झाला होता. खाजगी बसेसने नागपुरकडे येणारे बरेच प्रवासी आऊटर रिंग रोड किंवा बस उभी असलेल्या ठिकाणीच खाली उतरले व पायपीट करत शहराकडे निघाले. ठिय्या आंदोलनस्थळापासून मेट्रो स्थानकदेखील दूर होते.
आंदोलनाच्या नावाखाली नागरिकांना त्रास का ?
या वाहतूक कोंडीत लहान मुले, वृद्ध व्यक्तीदेखील अडकले होते. याशिवाय काही महाविद्यालयांतील विद्यार्थी-शिक्षक, खाजगी कंपन्यांतील कर्मचारी सायंकाळी कोंडीत अडकले. आंदोलनाच्या नावाखाली नागरिकांना त्रास का देता असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत होता.
रुग्णवाहिकादेखील अडकल्या
वर्धा, चंद्रपूरच्या दिशेकडून नागपुरकडे काही रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन निघाल्या होत्या. त्यांनादेखील या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. त्यांच्यासाठी पर्यायी मार्गाने जाण्याचादेखील पर्याय शिल्लक नव्हता.