Farmers carrying decayed produced to the Collector's Office | सडलेला शेतमाल घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर
सडलेला शेतमाल घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर

ठळक मुद्देपोलिसांनी केली धरपकड : आंदोलक संतप्त, सडलेली संत्री फेकली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपुढे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस, धान, भाजीपाल्यासह संत्रा, मोसंबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले. लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, याच्या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहेत. मात्र प्रशासकीय यंत्रणा अजूनही शेतापर्यंत पोहचली नाही. जिल्ह्यातील शेतमालाची अवस्था व शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासकीय प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडण्यासाठी सडलेला माल जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी बुधवारी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. परंतु पोलिसांनी केलेल्या धरपकडीमुळे आंदोलक चांगलेच संतापले. सडलेली संत्री जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपुढे फेकून पोलीस व जिल्हा प्रशासनाचा तीव्र निषेध आंदोलकांनी केला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. आकाशवाणी चौकात कळमेश्वर, काटोल, सावनेर भागातून शेतकरी सडलेल्या पऱ्हाट्या, सोयाबीन, संत्री, मोसंबी घेऊन आले होते. शेतमालाची ही अवस्था आणि शेतकऱ्यांची वेदना प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. परंतु ताबडतोब पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या धरपकडीमुळे आंदोलक चांगलेच संतप्त झाले. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊ लागले. काही आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपुढेच ठिय्या मांडला. यावेळी कळमेश्वरहून एका शेतकऱ्याने आणलेली पोतीभर सडलेली संत्री कार्यालयाच्या गेटपुढे फेकली. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आंदोलकांचा आग्रह होता. दरम्यान पोलिसांशी आंदोलकांची तू तू मै मै सुद्धा झाली. अखेर पोलिसांनी पाच लोकांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची सूट दिली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान पोलिसांनी राम नेवले, मुकेश मासूरकर, सुनील वडस्कर, वृषभ वानखेडे, वसंतराव वैद्य, प्रभाकर बेले, मोहन पाटोडे, विजय मौंदेकर, डॉ. पुखराज रेवतकर, विनायक खोरगडे, मोहन पाटोडे, भय्यालाल माकडे यांना अटक केली. आंदोलनात प्रीती देडमुठे, राजाभय्या, शेखर काकडे, अण्णाजी राजेदर, मुरलीधर ठाकरे, धर्मराज रेवतकर, पुंडलिक हरणे, रामदास राऊत, गुलाबराव धांडे, अशोक नेवले, श्रीराम अंबाडकर, पुरुषोत्तम हगवणे, नरेश निमजे, अनिल केशरवाणी, गणेश गंधेवार, नंदू पेरकर, भारत बावीसटाले, रमेश कन्नमवार, वसंतकुमार चौरसिया, योगेश कानोरकर, मोरेश्वर गौर आदी सहभागी झाले होते.
आम्ही जिल्हाधिकाऱ्यांपुढे नुकसान भरपाई लवकर मिळावी, अशी मागणी करण्यासाठी आलो होतो, परंतु पोलिसांनी दडपशाही केली. शेतकऱ्यांवर एवढा कठीण प्रसंग आला असतानाही जिल्हाधिकाऱ्यांपर्र्यंत वेदना मांडण्यासाठी पोलिसांनी जाऊ दिले नाही. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, हे स्पष्ट झाले आहे. नुकसान झाल्यानंतर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांच्या संगीत खुर्चीमध्ये सर्व व्यस्त असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
राम नेवले, संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती.

आंदोलकांच्या मागण्या
प्रशासनाला पंचनामे करण्यासाठी एक महिना लागणार असल्याने, उपग्रह अथवा नवीन तंत्रज्ञानाद्वारे ताबडतोब पिकांचे सर्वेक्षण करावे.
कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला पिकाला ३० हजार प्रति एकर आणि संत्रा व मोसंबी पिकाला ५० हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे.
हमीभावाचे खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे.
रब्बीच्या पेरणीसाठी त्वरित नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे.

Web Title: Farmers carrying decayed produced to the Collector's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.