उपराजधानीत वर्दळीच्या ठिकाणी बनावट विदेशी दारूचा कारखाना; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
By नरेश डोंगरे | Updated: November 21, 2025 19:07 IST2025-11-21T19:05:49+5:302025-11-21T19:07:08+5:30
Nagpur : यापूर्वी अशा प्रकारे शहरातील अनेक बनावट दारू कारखान्यावर एक्साईज तसेच पोलिस विभागाने कारवाई केली आहे. तरीसुद्धा दारू माफियांवर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही.

Fake foreign liquor factory in busy area of sub-capital; State Excise Department raids
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत अत्यंत वर्दळीच्या भागात सुरू असलेल्या बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (स्टेट एक्साईज) छापा घालून दोघांना अटक केली. या कारखान्यातून देशी-विदेशी दारू निर्माण करण्यासाठी वापरले जाणारे स्पिरिट तसेच अन्य साहित्य असा १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मनिष नंदकिशोर जयस्वाल (वय ४८) आणि विशाल शंभू मंडळ (वय २८) अशी आहेत. या दोघांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे. मनीष जयस्वाल आणि विशाल मंडळ यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने बेसा येथील न्यू हनुमान नगर या वर्दळीच्या भागात क्रिष्णा रॉयल मध्ये रो हाऊस घेतले होते. या रो हाऊसमध्ये ते देशी-विदेशी बनावट दारू तयार करीत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. त्याची माहिती कळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त गणेश पाटील तसेच राज्य उत्पादन शुल्क नागपूरचे अधीक्षक सुरजकुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी भरारी पथकाने छापा घातला यावेळी या बनावट कारखान्यात देशी-विदेशी दारू तयार करण्यासाठी लागणारे २०० लिटर स्पिरिट, विदेशी दारूचा तयार ब्लेंड १७५लिटर, ५१३ लिटर देशी दारू, १० लिटर ईसेन्स, रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या बाटल्या, प्लास्टिक बुच, कागदी लेबल तसेच एक दुचाकी असा एकूण ११ लाख, ९३ हजार, ८२ रुपयांचा मुद्देमाल आढळला. तो जप्त करण्यत आला.
कारखाना कुणाचा ?
यापूर्वी अशा प्रकारे शहरातील अनेक बनावट दारू कारखान्यावर एक्साईज तसेच पोलिस विभागाने कारवाई केली आहे. तरीसुद्धा दारू माफियांवर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. दरम्यान, हा कारखाना कुणाचा आहे आणि त्यात आणखी किती भागिदार आहेत, येथे तयार केेलेली बनावट दारू कुठे जात होती, त्याचा आता एक्साईज विभागाकडून शोध घेतला जात आहे.
जयस्वाल, मंडल दोघेही अट्टल
या कारवाईनंतर एक्साईजच्या रेकॉर्डवर आलेले मनीष जयस्वाल आणि विशाल मंडल हे दोघेही अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दशरथ क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक, जगदीश पवार, मिलींद लांबाडे, मंगेश कावळे अमित क्षिरसागर, बळीराम ईथर तसेच जवान गजानन राठोड, राहुल सपकाळ, सुधीर मानकर, किरण वैद्य, सचिन आडोळे, विनोद डुंबरे यांनी बजावली.