नागपुरात मेट्रो स्थानकाजवळ सापडली स्फोटके, घातपात की आणखी काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:25 IST2026-04-08T12:25:24+5:302026-04-08T12:25:37+5:30

बेवारस बॅगेत होते डेटोनेटर्स अन् जिलेटिनच्या कांड्या

Explosives found near metro station in Nagpur, was it a bomb attack or something else? | नागपुरात मेट्रो स्थानकाजवळ सापडली स्फोटके, घातपात की आणखी काही?

नागपुरात मेट्रो स्थानकाजवळ सापडली स्फोटके, घातपात की आणखी काही?

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: उपराजधानीतील सेंट्रल एव्हेन्यूवरील दोसरभवन चौकाजवळ मंगळवारी सकाळी एका बेवारस बॅगेत ५० डेटोनेटर्स आणि जिलेटिनच्या १५ कांड्या आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोसरभवन मेट्रो स्थानकाच्या मागील एका घराच्या मोकळ्या जागेत काही दिवसांपासून ही बॅग पडली होती. घरमालकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर या प्रकाराचा खुलासा झाला.

दोसरभवन चौकाजवळ डॉ. लांजेवार यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या मोकळ्या जागेत लहान बाग आहे. रस्त्याच्या दिशेने असलेल्या बाजूस मागील दोन महिन्यांपासून एक बेवारस बॅग पडली होती. मंगळवारी सकाळी लांजेवार यांच्या मुलाला ती बॅग दिसली व त्याने बॅगची पाहणी केली असता त्यात जिलेटिनच्या कांड्या दिसल्या. लांजेवार कुटुंबाने तातडीने पोलिसांना माहिती दिली.

स्फोटके नेमकी आली कोठून

नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्फोटक कारखाने आहेत. त्यातीलच एखाद्या कारखान्यातील ही स्फोटके असण्याची शक्यता आहे. दोसरभवन चौकाजवळचा भाग संवेदनशील मानण्यात येतो. त्यामुळे तेथे स्फोटकांची बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

तपास यंत्रणांची धावाधाव

बेवारस बॅगेत स्फोटके असल्याचे कळल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच बीडीडीएसचे पथक तेथे पोहोचले. बॅगची तपासणी केली असता त्यात ५० डेटोनेटर्स, जिलेटिनच्या १५ कांड्या व ८ कनेक्टर्स आढळले. संबंधित स्फोटके नेमकी कधीपासून तेथे होती व ती बॅग कुणी तेथे आणून टाकली याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकारानंतर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोबतच संबंधित स्फोटके तपासण्यासाठी ‘पेसो’ तसेच फॉरेन्सिकची पथकेदेखील घटनास्थळी पोहोचली.

Web Title : नागपुर मेट्रो स्टेशन के पास विस्फोटक बरामद: तोड़फोड़ या कुछ और?

Web Summary : नागपुर में दोसर भवन मेट्रो स्टेशन के पास एक लावारिस बैग में पचास डेटोनेटर और पंद्रह जिलेटिन की छड़ें मिलीं। पुलिस विस्फोटकों के स्रोत और उद्देश्य की जांच कर रही है, बम निरोधक दस्ते और फोरेंसिक टीमों को तैनात किया गया है। क्षेत्र में सुरक्षा बढ़ा दी गई है।

Web Title : Explosives Found Near Nagpur Metro Station: Sabotage or Something Else?

Web Summary : Fifty detonators and fifteen gelatin sticks were found in an abandoned bag near Dosar Bhavan metro station in Nagpur. Police are investigating the origin and purpose of the explosives, deploying bomb disposal and forensic teams to the scene. The area is under heightened security.