आयपीएस अधिकाऱ्याकडून डॉक्टर युवतीचे शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:52 IST2025-04-13T15:52:49+5:302025-04-13T15:52:49+5:30
लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीशी ठेवले शारीरिक संबंध

आयपीएस अधिकाऱ्याकडून डॉक्टर युवतीचे शोषण
नागपूर : पोलिस खात्यातील एका आयपीएस अधिकाऱ्यानेच लग्नाचे आमिष दाखवून उच्चशिक्षित डॉक्टर युवतीचे शोषण केल्याची घटना इमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी आरोपी आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
दर्शन दुगड (३०, रा. यवतमाळ), असे बलात्कार करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. सध्या तो नंदुरबार जिल्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर कार्यरत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित युवती एका खासगी महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. आरोपीची तिच्यासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यांच्यात नियमित चॅटिंग होऊ लागले आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
दरम्यान, आरोपी दर्शनने तिला केरळमध्ये फिरायला नेऊन शारीरिक संबंधाची मागणी केली. युवतीने नकार दिल्यानंतर त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून मागणी केली. युवतीने नकार दिल्यानंतर त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर इमामवाडा परिसरातील एका लॉजमध्येदेखील तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २०२२ ते २०२५ दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. परंतु, दर्शन आयपीएस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर लग्नाची मागणी करणाऱ्या डॉक्टर युवतीला शिवीगाळ करून लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित डॉक्टर युवतीने इमामवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली.