धक्कादायक! आईची हत्या करून मुलाची आत्महत्या; कुजलेल्या आवस्थेत आढळले मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 18:19 IST2022-04-27T17:32:27+5:302022-04-27T18:19:20+5:30
पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला असता तेथे कुजलेल्या स्थितीत दोघांचेही मृतदेह आढळून आले.

धक्कादायक! आईची हत्या करून मुलाची आत्महत्या; कुजलेल्या आवस्थेत आढळले मृतदेह
नागपूर : नागपुरात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सख्या मुलाने चाकूने वार करून आईचा निर्घृण खून केल्यानंतर स्वत: विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
लीला विष्णू चोपडे ( ७४) व श्रीनिवास विष्णू चोपडे (५१), अशी मृतकांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास हे अभियंते होते. गेल्या काही महिन्यांपासून ते बेरोजगार असल्यामुळे ते तणावात राहायचे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लीला यांच्या पोटावर चाकूने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर श्रीनिवास यांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली.
दरम्यान, लीला यांच्या मुंबईला राहणाऱ्या मुलीने मोबाइलवर त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्या सतत आईच्या मोबाइलवर कॉल करत होत्या परंतु, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने मुलीने बोखारा येथे राहणारे नातेवाइक सागर प्रभाकर इंगळे (वय ३५) यांना घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितले. सागर हे हिंदुस्थान कॉलनी येथे आले असता लीला यांच्या घराच्या दरवाजाला कुलूप होते. त्यांनी आसपास डोकावून पाहिले व शंका आल्याने त्यांनी धंतोली पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. कुलूप तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला असता तेथे कुजलेल्या स्थितीत दोघांचे मृतदेह आढळून आले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविले. धंतोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.