नागपुरात निवडणूकीचा शंखनाद, भाजपच्या कार्यालयात आजपासून मुलाखतींचे सत्र
By योगेश पांडे | Updated: December 15, 2025 20:29 IST2025-12-15T20:29:14+5:302025-12-15T20:29:44+5:30
निवडणूक संचालन समिती गठीत : विधानसभा क्षेत्रानुसार प्रभारींची नियुक्ती

Election conch shelling in Nagpur, interview sessions at BJP office from today
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीची घोषणा झाल्याबरोबर भाजपच्या गोटात उमेदवारीबाबत हालचालींनी वेग घेतला आहे. प्रभागपातळीवर निरीक्षकांनी मुलाखती घेतल्यानंतर आता भाजपच्या कार्यालयात मंगळवारपासून मुलाखतींचे सत्र सुरू होणार आहे. सोबतच पक्षाकडून निवडणूक संचालन समिती गठीत करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत भाजपच्या गणेशपेठ कार्यालयात होतील. विधानसभा व प्रभागानुसार मुलाखती होणार आहे. १६ डिसेंबर रोजी पूर्व व पश्चिम नागपूर, १७ डिसेंबर रोजी उत्तर व दक्षिण नागपूर, १८ डिसेंबर रोजी दक्षिण-पश्चिम व मध्य नागपूर अशा मुलाखती होतील.
सोबतच भाजपने महानगरपालिकांसाठी विधानसभा क्षेत्रानुसार प्रभारींची नियुक्ती केली आहे. पूर्व नागपुरसाठी माजी आमदार अनिल सोले, पश्चिम नागपूरसाठी राजेश बागडी, दक्षिण-पश्चिमसाठी आ.प्रवीण दटके, मध्य नागपूरसाठी माजी आमदार गिरीश व्यास, दक्षिण नागपूरसाठी भोजराज डुंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच नियोजनासाठी निवडणूक संचालन समिती गठीत करण्यात आली आहे. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर आ.प्रवीण दटके हे निवडणूक प्रभारी असतील. निवडणूक प्रमुख म्हणून संजय भेंडे, सहप्रमुख म्हणून विष्णू चांगदे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
महायुतीशी समन्वयाची जबाबदारी तीन नेत्यांवर
दरम्यान महायुती एकत्रित लढणार असल्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहे. त्यामुळे महायुती समन्वयाची जबाबदारी शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आ.प्रवीण दटके व प्रा.संजय भेंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रचार यंत्रणा समन्वयक म्हणून आ.संदीप जोशी, रितेश गावंडे हे काम पाहतील.