एसआयटीच्या प्रश्नांनाही निवडणूक आयोग उत्तर देईना; आलंदचे आमदार बी. आर. पाटील यांचा 'व्होट चोरी'चा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:27 IST2025-10-04T15:21:23+5:302025-10-04T15:27:38+5:30
Nagpur : पाटील म्हणाले, मतदाराची नावे वगळण्यासाठी स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे बोगस अर्ज सादर करण्यात आले. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना बोगस नावांनी फोन करून नावे वगळण्यास आपली संमती असल्याचे सांगण्यात आले.

Election Commission will not answer even the questions of SIT; Aland MLA B. R. Patil alleges 'vote theft'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्नाटकातील अलंद विधानसभा मतदारसंघात ६ हजार मतदारांची नावे परस्पर वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे फसवे अर्ज सादर करण्यात आले. सीआयडीने निवडणूक आयोगाला १८ पत्र पाठविले, पण संपूर्ण माहिती आयोगाकडून दिली गेली नाही. आता राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या प्रश्नांनाही निवडणूक आयोग उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे. यावरून निवडणूक आयोग व्होट चोरांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप कर्नाटक राज्य धोरण व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष व अलंदचे आमदार बी. आर. पाटील यांनी केला.
शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषदेत आ. बी.आर. पाटील म्हणाले, मतदाराची नावे वगळण्यासाठी स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे बोगस अर्ज सादर करण्यात आले. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना बोगस नावांनी फोन करून नावे वगळण्यास आपली संमती असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक अर्ज हा बूथ यादीतील क्र. १ च्या नावाने दाखल करण्यात आला. एका प्रकरणात ३६ सेकंदांत दोन अर्ज रात्री ४ वाजता दाखल झाले.
गोदाबाई यांच्या नावाने १२ मतदारांना वगळण्याचा प्रयत्न झाला. सूर्यकांत यांच्या नावाने ३४ मिनिटांत १२ अर्ज दाखल झाले. यावर निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर दिशाभूल करणार आहे. जर सर्व माहिती आधीच दिली असेल तर कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी ४ फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी व १४ मार्च २०२५ रोजी पुन्हा पुन्हा तीच माहिती मागण्यासाठी का पत्र लिहीत आहेत, सीआयडीने गेल्या १८ महिन्यांत १८ पत्रे लिहूनही, २९ सप्टेंबर २०२५ रोजी सुद्धा का तीच माहिती मागावी लागली, आयोगाकडून गंतव्य आयपी, डिव्हाइस पोर्ट आणि ओटीपी ट्रेल्सची माहिती का दिली जात नाही, असे प्रश्न आ. पाटील यांनी उपस्थित केले. यावेळी काँग्रेसचे आ. विकास ठाकरे व पदाधिकारी प्रा. दिनेश बानाबाकोडे उपस्थित होते.
न्यायालयात आव्हान देणार
अलंदमध्ये झालेल्या व्होट चोरीबाबत काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी तीनदा आपल्याशी चर्चा केली आहे. याप्रकरणी न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची आपली तयारी आहे. पक्षाकडून निर्देश प्राप्त होताच आपण पुढील पाऊल उचलू, असेही आ. बी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले.