महिलेच्या अंत्यसंस्कारादरम्यान चितेचा भडका उडून वृद्धाचा मृत्यू
By योगेश पांडे | Updated: November 20, 2025 18:12 IST2025-11-20T18:11:39+5:302025-11-20T18:12:49+5:30
Nagpur : महिला नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारादरम्यान चितेचा भडका उडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा दहन घाटावर हा अपघात झाला.

Elderly man dies after pyre explodes during woman's funeral
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारादरम्यान चितेचा भडका उडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा दहन घाटावर हा अपघात झाला.
विनोद पुंडलीकराव मुनघाटे (६४, कर्वेनगर, वर्धा मार्ग) असे मृतकाचे नाव आहे. १५ नोव्हेंबर रोजी सुशीलाबाई मुनघाटे (८३, गोपालकृष्ण लॉनच्या मागे, वाठोडा) यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक नातेवाईक आले होते. अंत्यसंस्कारादरम्यान विनोद हे चितेच्या बाजूला उभे होते. अचानक चितेवर डिझेल टाकण्यात आले व आगीचा भडका उडाला. त्यात विनोद यांच्यासह आणखी चार नातेवाईक भाजले व जखमी झाले. त्यांना अगोदर मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. तेथून विनोद यांना ऑरेंज सिटी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे भाचे साकेत अनिल गेडाम (३६, सिताबर्डी) यांच्या सूचनेवरून वाठोडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.