मोबाईल ॲप पाहून आठवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 12:44 IST2023-01-28T12:42:40+5:302023-01-28T12:44:49+5:30

सोमवारी क्वाॅर्टर परिसरातील घटना

Eighth student commits suicide by hanging himself in nagpur after seeing mobile app | मोबाईल ॲप पाहून आठवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

मोबाईल ॲप पाहून आठवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

नागपूर : मोबाईल ॲप पाहून तशीच कृती करण्याच्या प्रयत्नात आठवीत शिकत असलेल्या १२ वर्षीय विद्यार्थ्याने ओढणीने गळफास घेत आपला जीव गमावला. ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोमवारी क्वार्टर परिसरात घडली.

अग्रण्य सचिन बारापात्रे (वय १२, सोमवारी क्वाॅर्टर) असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सुरेश बारापात्रे (४०) हे परिसरात नानासाहेब राऊत यांच्या घरी किरायाने राहतात. बुधवारी दुपारच्या सुमारास घराच्या बाजूला राहणारे किशोर पांडुरंग चिखले (सोमवारी क्वाॅर्टर) याच्या टेरेसवर अग्रण्य खेळायला गेला होता. दरम्यान, वडील काही कामानिमित्त बाहेर, तर आई घरकामात व्यस्त होती. काही वेळा अग्रण्यने पतंग उडविली. त्यानंतर तिथेच असलेल्या लाकडी शिडीवर तो आजूबाजूच्या नागरिकांना खेळताना दिसला. त्यानंतर सायंकाळी ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास टेरेसवर असलेल्या लाकडी शिडीला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो एका नागरिकाला दिसला.

ही माहिती त्यांनी घरमालक किशोर चिखले यांना दिली. त्यांनी टेरेसवर पाहिले असता तो ओढणीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती अग्रण्यच्या आईला दिली. त्यांनी आणि घरमालकांनी त्याला उपचारांसाठी मेडिकलला नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अग्रण्यची आई गृहिणी असून, त्याचे वडील इलेक्ट्रिकचे काम करतात.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासांत अग्रण्यला मोबाईलचे वेड होते. त्याने आईच्या मोबाईलमध्ये अनेक ॲप डाऊनलोड केले होते. त्यापैकीच एका ॲपमध्ये गळ्यात दोर लटकवून तो कसा काढायचा याबाबतची माहिती तो सातत्याने बघत होता. त्यातूनच बुधवारी त्याने तसा प्रयत्न केल्याने त्यातून लागलेल्या गळफासात त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासांत पुढे आले आहे. सक्करदरा पोलिसांना मिळालेल्या सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एम्समध्ये सुरू होता उपचार

अग्रण्य एकुलता एक मुलगा होता. तो तापट स्वभावाचा असल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला एम्स येथील एका डॉक्टरांनाही दाखविले होते. त्यात त्याला एक मानसिक आजार असल्याचेही समोर आले होते. त्यासाठी त्याला औषधही देण्यात आले होते.

Web Title: Eighth student commits suicide by hanging himself in nagpur after seeing mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.