नागपूरच्या मनीषनगर परिसरातील आठ हजार वीज ग्राहकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:29 IST2019-05-06T23:28:02+5:302019-05-06T23:29:04+5:30
महामेट्रोच्या कंत्राटदाराच्या जेसीबीने ११ केव्ही जयदुर्गा फिडरला नुकसान पोहोचवल्याने मनीषनगर परिसरातील तब्बल आठ हजार वीज ग्राहकांना फटका बसला. तब्बल दीड तास या ग्राहकांना उन्हाळ्यात विजेविना उकाडा सहन करावा लागला.

नागपूरच्या मनीषनगर परिसरातील आठ हजार वीज ग्राहकांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या कंत्राटदाराच्या जेसीबीने ११ केव्ही जयदुर्गा फिडरला नुकसान पोहोचवल्याने मनीषनगर परिसरातील तब्बल आठ हजार वीज ग्राहकांना फटका बसला. तब्बल दीड तास या ग्राहकांना उन्हाळ्यात विजेविना उकाडा सहन करावा लागला.
सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महामेट्रोचे कंत्राटदार राजेश बावनगडे मनीषनगरच्या रिलायन्स फ्रेश नजीक जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करत असताना एक महत्त्वाची भूमिगत केबल क्षतिग्रस्त झाली. एसएनडीएलने केलेल्या दाव्यानुसार या आधीच्या सर्व घटनांप्रमाणेच यावेळी सुद्धा खोदकामाची पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. खोदकाम लगेच थांबवण्यात आले. परंतु तोपर्यंत केबलला नुकसान झालेले होते. दरम्यान हा प्रकार एका प्रत्यक्षदर्शीने कळवल्यानंतर एसएनडीएलची चमू घटनास्थळी पोहोचली. या चमुने पाऊण तासाच्या परिश्रमानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला.
मात्र तेव्हापर्यंत मनीषनगर, पँथन सोसायटी, रिलायन्स फ्रेश, प्रभूनगर, लुंबिनीनगर, जयदुर्गा सोसायटी, कृषीनगर सोसायटी, माणिक पार्क, जयहिंद सोसायटी, पंचतारा सोसायटी, संताजी सोसायटी आदी आठ हजाराहून अधिक ग्राहकांची विजेमुळे गैरसोय झाली होती.