शिक्षण बारावीच तरीही मिळविली विदेशात नाेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST2021-09-12T04:12:48+5:302021-09-12T04:12:48+5:30

शरद मिरे भिवापूर : तालुक्यातील अड्याळ या गोसेखुर्द बुडीत गावात जन्म झालेल्या एका तरुणाने बारावीच्या शिक्षणाच्या बळावर विदेश गाठले. ...

Education is still available in foreign countries | शिक्षण बारावीच तरीही मिळविली विदेशात नाेकरी

शिक्षण बारावीच तरीही मिळविली विदेशात नाेकरी

शरद मिरे

भिवापूर : तालुक्यातील अड्याळ या गोसेखुर्द बुडीत गावात जन्म झालेल्या एका तरुणाने बारावीच्या शिक्षणाच्या बळावर विदेश गाठले. इतकेच नव्हे तर याच शिक्षणाच्या बळावर त्याने तेथे चांगली नाेकरीही मिळविली. नुकताच ‘ताे’ मायदेशी परतला. त्याच्या येण्याची चाहुल येथील शिक्षकांना लागताच त्यांनी जीवनाच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या आपल्या विद्यार्थ्याचा सत्कार केला.

दादाराव तेलंग असे त्यांचे नाव आहे. दादाराव तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पात बुडीत ठरलेल्या अड्याळ गावातील रहिवासी. येथेच त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी भिवापूर एज्युकेशन सोसायटी बॉईज हायस्कूल शाळा गाठली. तेव्हा तालुक्यात आयटीआय शिक्षण संस्था नसावी. त्यामुळे स्वयंरोजगार करण्याच्या उद्देशाने दादाराव यांनी दहावी उत्तीर्ण होताच एमसीव्हीसी (इलेक्ट्रीकल) मध्ये प्रवेश केला. बारावी उत्तीर्ण होताच काही दिवस गावात त्यानंतर नागपूर व्हाया साऊथ आफ्रिका गाठले. तेथे चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नाेकरी मिळाली. त्यामुळे मागील कित्येक वर्षापासून दादाराव साऊथ आफ्रिकेत वास्तव्यास आहेत. काैटुंबिक कामाकरिता ते नुकतेच भिवापूर येथे आले. शिक्षकांना याची माहिती मिळताच त्यांना शाळेत येण्याचे निमंत्रण दिले. शाळेच्या शिक्षकांनी त्यांचा छोटेखानी सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक वैभव समर्थ, प्रा. सुनील ठाकरे, प्रा. विकास पिल्लेवान उपस्थित होते. यावेळी दादाराव यांनी आपल्या साऊथ आफ्रिका प्रवासाचे अनुभव सांगितले. डोळ्यापुढे ध्येय ठेवून त्यासाठी जिद्दीने कष्ट उपसल्यास यश निश्चितच तुमच्या पदरात पडेल, असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

....

स्वातंत्र्य संग्राम सैनिकाची दूरदृष्टी आली कामात

स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी आमदार स्व. सदाशिवराव समर्थ यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी शहरात प्रशस्त जागेवर भव्य इमारत उभारून शिक्षण संस्था सुरू केली. शिवाय बारावीचे शिक्षण रोजगाराभिमुख व स्वयंरोजगाराचे धडे देणारे असावे, यासाठी एमसीव्हीसी शाखा सुरू केली. स्व. सदाशिवराव समर्थ यांची ही दूरदृष्टी आज अनेक विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यास महत्त्वाची ठरली आहे.

110921\img-20210903-wa0062.jpg

दादाराव तेलंग यांचा सत्कार करतांना शाळेचे शिक्षकवृंद

Web Title: Education is still available in foreign countries