दुरांतो एक्स्प्रेसचा टाइम टेबल बदलणार; असा असेल नवीन वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 19:53 IST2026-02-09T19:52:44+5:302026-02-09T19:53:20+5:30
Nagpur : मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२२८९/९०) च्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Duronto Express time table will change; this will be the new schedule
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२२८९/९०) च्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशनल कारणांमुळे करण्यात आलेल्या या बदलांमुळे दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवासाच्या कालावधीत १५ मिनिटांची वाढ होणार आहे. गाडीचे हे सुधारित वेळापत्रक १४ एप्रिलपासून लागू होईल.
सध्या सुमारे ८०० किलोमीटरचे अंतर ही गाडी ११ तास ३५ मिनिटांत पार करते. मात्र, नवीन वेळापत्रकानुसार हा प्रवास आता ११ तास ५० मिनिटांचा होणार आहे. सध्या मुंबई सीएसएमटी येथून दुरांतो एक्स्प्रेस रात्री ७:५५ वाजता रवाना होते. नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी रात्री ८:३५ वाजता सुटणार आहे. नागपूर येथे आगमनाची वेळही बदलण्यात आली असून, सध्या सकाळी ८:०५ वाजता पोहोचणारी गाडी १४ एप्रिलपासून सकाळी ७:५० वाजता पोहोचेल.
नागपूर-मुंबई- दुरांतो एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सध्या ही गाडी रात्री ८:३० वाजता नागपूरहून सुटते. मात्र, १४ एप्रिलपासून ही गाडी ३५ मिनिटे आधी म्हणजेच रात्री ७:५५ वाजता मुंबईकडे रवाना होईल. मुंबईत या गाडीच्या नवीन आगमनाची वेळ सकाळी ८:२० वाजता असेल. यापूर्वी ती सकाळी ७:२० वाजता पोहोचत होती. दरम्यान, गाडी सुटण्याची वेळ आधी झाल्याने अनेक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
इतर गाड्यांच्याही वेळापत्रकात बदल
याशिवाय, गाडी क्रमांक १२१०५ विदर्भएक्स्प्रेसच्या बडनेरा स्थानकावरील थांब्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नवीन वेळेनुसार ही गाडी सकाळी ६:०५ वाजता बडनेरा येथे पोहोचेल (यापूर्वी ६.०० वाजता पोहोचत होती). तसेच गाडी नंबर १२११३ पुणे-नागपूर गरीब रथ आणि १२११४ पुणे-नागपूर एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकातही सुधारणा करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी नवीन वेळापत्रकाची माहिती तपासून नंतरच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.