उत्तरेकडे धुक्याची चादर, विदर्भात थंडीचा जाेर वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:39 PM2022-12-22T12:39:27+5:302022-12-22T12:39:48+5:30

सह्याद्री व सातपुडा रांगामधून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा जाेर वाढण्याची शक्यता

due to the cold winds blowing from the Sahyadri and Satpura ranges, possibility of increasing cold in Maharashtra | उत्तरेकडे धुक्याची चादर, विदर्भात थंडीचा जाेर वाढेल

उत्तरेकडे धुक्याची चादर, विदर्भात थंडीचा जाेर वाढेल

Next

नागपूर : उत्तर भारताच्या पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम राजस्थान राज्यात सध्या घनदाट धुक्याची चादर पसरली आहे. या दिशेकडून सह्याद्री व सातपुडा रांगामधून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा जाेर वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात अति थंडी जाणवणार असून, नागपूरसह विदर्भात मात्र तीव्रता कमी राहण्याचा अंदाज आहे.

सध्या नागपूर शहरातही पहाटेच्या प्रहरात हलके धुके दाटलेले आहे. दरम्यान, २४ तासांत रात्रीच्या तापमानात सूक्ष्म अंशाची वाढ हाेऊन ते १२.९ अंश नाेंदविण्यात आले. इतर जिल्ह्यातही रात्रीचा पारा काही अंशाने वाढला. मंगळवारी १०.५ अंशांवर असलेल्या गाेंदियात तापमान ११.८ अंशांवर गेले. यवतमाळमध्ये सर्वात कमी ११.५ अंश तापमानाची नाेंद झाली आहे. अमरावती, बुलढाणा व यवतमाळ वगळता इतर जिल्ह्यांत तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही चढाव दिसून आला. अकाेल्यात सर्वाधिक ३३.२ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. चंद्रपूर व गाेंदिया वगळता इतर सर्व जिल्ह्यांत पारा ३१ अंशाच्या वर पाेहोचला आहे. गुरुवारपासून दाेन्ही तापमानात काही अंशांची घट हाेण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते श्रीलंका किनारपट्टीवरून कन्याकुमारीच्या टाेकापर्यंत वळले आहे. यामुळे तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकमध्ये मध्य पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रावर या वातावरणाचा प्रभाव जाणवणार नाही. केवळ दक्षिण महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात हलके ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Web Title: due to the cold winds blowing from the Sahyadri and Satpura ranges, possibility of increasing cold in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.