नागपूरचा इंजिनिअर वर्षभरापासून मालीच्या तुरुंगात; जामीन मिळूनही कंपनीने ३.२५ कोटी न भरल्याने सुटका रखडली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:02 IST2026-02-20T14:46:47+5:302026-02-20T15:02:00+5:30
नागपूरचा इंजिनिअर वर्षभरापासून आफ्रिकेच्या तुरुंगात; जामीन मिळूनही सुटका नाही

नागपूरचा इंजिनिअर वर्षभरापासून मालीच्या तुरुंगात; जामीन मिळूनही कंपनीने ३.२५ कोटी न भरल्याने सुटका रखडली!
एकीकडे परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न पाहिले जाते, तर दुसरीकडे कंपनीच्या तांत्रिक चुकांमुळे एका निष्पाप कर्मचाऱ्याला नरकयातना भोगाव्या लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागपूरचे ४२ वर्षीय इंजिनिअर नितीन गुल्हाणे हे गेल्या एका वर्षापासून पश्चिम आफ्रिकेतील माली देशातील तुरुंगात अडकून पडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ५ महिन्यांपूर्वी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असूनही, ज्या कंपनीने त्यांना तिथे पाठवले, त्यांनी ३.२५ कोटी रुपयांचा जामीन बाँड न भरल्याने त्यांची सुटका होऊ शकलेली नाही.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नितीन गुल्हाणे हे नोएडा येथील आर एस एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीने त्यांना एका प्रकल्पासाठी माली देशाची राजधानी बमाको येथे पाठवले होते. गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी, कामावर रुजू झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच त्यांना तेथील स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेतले. कंपनीचे संचालक राजेश रामचंद्रन यांच्यासोबत त्यांनाही अटक करण्यात आली. कंपनीचे निर्णय आणि तांत्रिक चुकांमुळे हे प्रकरण उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे.
जामीन मिळाला, पण पैसा कोण भरणार?
१५ ऑगस्ट २०२५ रोजी माली येथील न्यायालयाने गुल्हाणे यांना जामीन मंजूर केला. मात्र, त्यासाठी ३.२५ कोटी रुपयांचा जामीन बाँड भरण्याची अट घालण्यात आली. ५ महिने उलटून गेले तरी नोएडास्थित कंपनीने ही रक्कम जमा केलेली नाही. दुसरीकडे, याच प्रकरणात अडकलेल्या कंपनी संचालकाला अद्याप जामीन मिळालेला नाही.
नितीन गुल्हाणे यांच्या प्रकृतीबाबत चिंता
नितीन यांच्या पत्नी प्रियांका गुल्हाणे यांनी आपल्या पतीच्या जीवाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, "नितीन हे हृदयविकाराचे रुग्ण असून त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तुरुंगातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांना तिथेच ठेवणे त्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते." प्रियांका सध्या नागपुरात आपल्या दोन मुलांसह राहतात. पतीच्या अटकेनंतर कंपनी त्यांना फक्त निम्मा पगार देत आहे, जो त्यांच्या औषधोपचारासाठीही अपुरा पडत आहे.
मदतीसाठी केंद्र सरकारकडे साकडं
प्रियांका यांनी मदतीसाठी नोएडा येथील कंपनी कार्यालय, दिल्लीतील साऊथ ब्लॉक, आफ्रिकेतील भारतीय मिशन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात परराष्ट्र मंत्रालयाने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र मिश्रा यांची भेट घेतली होती. मात्र, मिश्रा हे वारंवार मुदत वाढवून घेत असून जामिनाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप प्रियांका यांनी केला आहे.
कंपनी आणि दूतावासाची भूमिका संशयास्पद?
या संदर्भात कंपनीचे एमडी राजेंद्र मिश्रा यांना विचारले असता, त्यांनी बैठकीत व्यस्त असल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्याचे टाळले. दुसरीकडे, माली येथील भारतीय दूतावासातील अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे गुल्हाणे कुटुंब अधिकच संकटात सापडले आहे.