नागपूर स्टेशनवर नाट्यपूर्ण क्षण : घरच्यांच्या रागाच्या भीतीने पळून निघालेल्या मुली परतल्या

By नरेश डोंगरे | Updated: July 24, 2025 20:00 IST2025-07-24T19:54:51+5:302025-07-24T20:00:44+5:30

आरपीएफकडून वेळीच मिळाली मदत : अन्यथा झाला असता घात

Dramatic moment at Nagpur station : Girls who ran away fearing family's wrath return | नागपूर स्टेशनवर नाट्यपूर्ण क्षण : घरच्यांच्या रागाच्या भीतीने पळून निघालेल्या मुली परतल्या

Dramatic moment at Nagpur station : Girls who ran away fearing family's wrath return

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
परिस्थितीमुळे झालेली कोंडी फोडण्यासाठी 'त्या' चाैघी एका 'सिनियर'च्या आधाराने मुंबईकडे निघाल्या. मात्र, मानसिक अस्वस्था चांगली नसल्याने त्या नागपुरातच उतरल्या. वेळीच त्यांना आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी हेरले. परिणामी त्या पुन्हा त्यांच्या कुटुंबियांमध्ये सुखरूप परतू शकल्या.

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या युवतीची ही कथा आहे. यातील चार जणी १६ ते १७ वयोगटातील आहेत. परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण अर्ध्यावर सुटलेले. कुटुंबियांची आर्थिक अवस्था बिकट असल्याने त्यांनाही उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करावी लागते. गावातील अन्य मुली छान-छाैकीने राहतात, फिरतात. आपल्याला काहीच मिळत नाही. शिवाय कुठे फिरायलाही जाता येत नाही, अशी खंत वाटत असल्याने त्या चाैघी एकमेकींसमोर आपल्या भावना व्यक्त करायच्या. त्यांच्यात सिनियर (सज्ञान) असलेली संजना (नाव काल्पनिक) हिच्याशी बोलताना त्या आपली मानसिक कोंडी होत असल्याचे सांगायच्या. दोन दिवसांपूर्वी अशाच गप्पा करताना घुसमट कमी करण्यासाठी त्यांनी जवळच्या एका दर्शनीय ठिकाणी फिरायला जाण्याची योजना बनविली. त्यानुसार, २२ जुलैला त्या चाैघी आणि संजना अशा पाच जणी गावातून बाहेर पडल्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरी परत येऊ, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, पहिल्यांदाच निघाल्यामुळे त्यांनी तिकडे फिरण्या-बागडण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यामुळे त्यांना रात्र झाली. आता घरी गेल्यानंतर कुटुंबिय नको तो संशय घेऊन रागावतील, मारतील, अशी भिती त्यांना वाटू लागली. परिणामी त्यांनी 'स्टँडिंग प्लॅन' बनवित मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. दुर्ग स्थानकावर उभी असलेल्या गाडीत बसून त्या नागपूररेल्वे स्थानकावर उतरल्या. येथे मात्र, त्यांची अस्वस्थता अधिक तीव्र झाली. त्यामुळे उर्सनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी उभारलेल्या तात्पुरत्या निवाऱ्याजवळ थांबल्या. त्यांची सैरभैर अवस्था लक्षात घेत आरपीएफचे व्ही. पी. सिंग, अंमलदार मंजू शर्मा, जुमा इंगळे यांनी त्यांची विचारपूस सुरू केली.

पलायन नाट्यानंतर घरवापसी
चार अल्पवयीन मुलींसह पाच जणींची पलायन कथा माहिती झाल्यानंतर आरपीएफचे निरीक्षक यादव यांनी चाईल्ड लाईनच्या मदतीने नमूद पाचही जणींच्या पालकांशी संपर्क केला. त्यानंतर त्यांची रवानगी शासकीय मुलींच्या वस्तीगृहात करण्यात आली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी त्यांचे पालक नागपुरात पोहचले. कायदेशिर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले. अशा पद्धतीने आरपीएफमुळे या मुलींची सुखरूप घरवापसी झाली.

Web Title: Dramatic moment at Nagpur station : Girls who ran away fearing family's wrath return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.