डॉ. आनंद कौसल्यायन यांनी केली सामाजिक क्रांतीची पायाभरणी : केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार
By आनंद डेकाटे | Updated: January 5, 2026 20:36 IST2026-01-05T20:35:50+5:302026-01-05T20:36:18+5:30
Nagpur : डॉ. आनंद कौसल्यायन यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचा हिंदी अनुवाद करून सामाजिक क्रांतीची पायाभरणी केली, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी येथे केले.

Dr. Anand Kausalyayan laid the foundation of social revolution: Union Minister Dr. Virendra Kumar
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. आनंद कौसल्यायन यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचा हिंदी अनुवाद करून सामाजिक क्रांतीची पायाभरणी केली, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी येथे केले.
बौद्ध प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महान बौद्ध विद्वान डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त नवनिर्मित ‘महाचैत्य’ स्तूप आणि २८ बुद्ध मूर्तींचा लोकार्पण सोहळा सोमवारी कामठी रोडवरील खैरी बुद्धभूमी महाविहार येथे पार पडला. या समारंभाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्ता मेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न मानके होते.
प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शामकुमार बर्वे, आ. डाॅ. नितीन राऊत, आमदार संजय मेश्राम, माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, माजी नगराध्यक्ष माया चवरे, भदंत पी. सिवली थेरो, भदंत मैत्री महाथेरो (नेपाळ), भदंत यश (श्रीलंका), आवाज इंडिया टीव्हीचे संचालक अमन कांबळे, श्रीलंकन चित्रपट दिग्दर्शक रोडनी वितानपतिराना, बुद्धभूमी महाविहार संस्थेचे अध्यक्ष भदंत शिवणी बोधानंद थेरो आणि सचिव भदंत प्रज्ञाज्योती थेरो, काशिनाथ मेश्राम, विमल आळे, उज्ज्वल उके, भदंत अश्वघोष थेरो, भदंत प्रियदर्शी, भदंत धम्मधर, भदंत शीलरक्षित उपस्थित होते.
डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले, केंद्र सरकार बौद्ध वारसा जपण्यासाठी कटिबद्ध आहे. थायलंड, व्हिएतनाम आणि मंगोलिया येथे भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या दर्शनासाठी उसळलेली गर्दी बुद्धांच्या विचारांची जागतिक शक्ती दर्शवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. सुलेखा कुंभारे यांनी बौद्ध प्रशिक्षण संस्थेने १०० कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करावा, असे आवाहन केले.
डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या भाषणात बुद्धभूमीचा जागतिक पातळीवर विकासासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी केली.
संचालन भदंत नाग दीपंकर यांनी केले. तर डाॅ. चिंचाळ मेत्तानंद यांनी आभार मानले.
मेट्रो स्टेशनला ‘बुद्धभूमी महाविहार’ नाव देण्याची मागणी
दरम्यान महाविहारजवळील स्थानिक मेट्रो स्टेशनला बुद्धभूमी महाविहार असे नाव देण्याची मागणी यावेळी विविध वक्त्यांकडून करण्यात आली. यावेळी डॉ. वीरेंद्र कुमार यांनी ही मागणी मान्य करीत यासंदर्भात तात्काळ रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.