डॉ. अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महानगर आयुक्तपदी बदली
By गणेश हुड | Updated: March 4, 2026 20:49 IST2026-03-04T20:49:34+5:302026-03-04T20:49:54+5:30
Nagpur : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Dr. Abhijit Chaudhary transferred as Metropolitan Commissioner at Pune Metropolitan Region Development Authority
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्याकडे सोपविण्यात यावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी बुधवारी काढले.
डॉ. चौधरी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१० बॅचचे आयएएस अधिकारी असून जुलै २०२३ पासून ते नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘पौर जन हिताय’ या ध्येयवाक्यानुसार नागरी सुविधांमध्ये सुधारणा, प्रशासनातील पारदर्शकता आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या गतीकरणावर विशेष भर दिला.
त्यांच्या कार्यकाळात शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्याबरोबरच नागपुरात इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविणे, ई-प्रशासकीय सुधारणा राबविणे आणि विविध पायाभूत प्रकल्पांना गती देणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली. त्यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्य केले आहे. तसेच भंडारा व सांगली जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी प्रशासनाची धुरा सांभाळली आहे.दरम्यान, त्यांच्या बदलीनंतर नागपूर मनपाच्या प्रशासकीय कारभारात पुढील नियुक्तीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी राहणार आहे.