"माझा डाटा वापरू नका.. " अनेकांच्या फेसबुकवर व्हायरल पोस्टचे सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:34 IST2025-08-14T12:34:17+5:302025-08-14T12:34:54+5:30

Nagpur : फेसबुक डाटा चोरीच्या अफवेमुळे घबराट

"Don't use my data.." What is the truth behind the viral post on Facebook by many? | "माझा डाटा वापरू नका.. " अनेकांच्या फेसबुकवर व्हायरल पोस्टचे सत्य काय?

"Don't use my data.." What is the truth behind the viral post on Facebook by many?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गेल्या २४ तासांत फेसबुक वापरकर्त्या अनेकांनी आपल्या स्टेटसवर 'माझा डाटा वापरू नये' अशा प्रकारचे संदेश पोस्ट केले आहेत. ही घबराट एका व्हायरल संदेशाने पसरली आहे. फेसबुक नवीन धोरण आणत असून, त्यानुसार वापरकर्त्यांची नाव, फोटो, व्हिडीओ, मोबाइल नंबर ही वैयक्तिक माहिती विनापरवानगी वापरली जाणार, असा दिशाभूल करणारा मेसेज व्हायरल झाल्यानंतर शहरातील फेसबुक वापरकर्त्यांमध्ये घबराट पसरली आहे. जणू काही मार्क झुकरबर्ग त्यांच्या परवानगीची वाट पाहत आहेत, अशा प्रकारे अनेकांनी घाईघाईत स्टेटसवर डिस्क्लेमर संदेश टाकले. नागपूर पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांनी हा संदेश पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या अफवा २०२०-२१ पासून अधूनमधून येत राहिल्या आहेत आणि परदेशातही पसरल्या आहेत. अशा कोणत्याही धोरणाचा विचार फेसबुक किंवा मेटा करत नाही. हे फक्त गोंधळ घालण्याचे काम आहे, असे पोलिसांनी सांगितले. अनेक वापरकर्ते स्वतःच फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर आपले फोटो, वैयक्तिक तपशील आणि लोकेशन सहजपणे शेअर करतात.


हे लोक अफवेला घाबरले आहेत. लोक स्वतःच सुट्टीतील फोटो आणि लोकेशन टाकत असताना मेटाला ही वैयक्तिक माहिती चोरण्याची गरज काय, असा विनोदी टोला पोलिस अधिकाऱ्याने लगावला. अशा पोस्ट्स दर दोन-तीन वर्षांनी पुन्हा समोर येतात, भीती पसरवतात आणि टाइमलाइनवर कॉपी-पेस्ट स्टेटसची गर्दी करतात, एवढेच त्यांचे 'यश' असते, असेही तज्ज्ञांनी सांगितले. अफवा फॉरवर्ड करण्यापेक्षा, फेसबुकवरील प्रायव्हसी सेटिंग्ज सुधारण्यात वेळ घालवणे हे अधिक फायदेशीर ठरेल, असा सल्लाही अधिकाऱ्यांनी दिला.

Web Title: "Don't use my data.." What is the truth behind the viral post on Facebook by many?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.