महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की तुकडे पाडू ईच्छिता; उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
By नरेश डोंगरे | Updated: December 12, 2025 19:50 IST2025-12-12T19:49:41+5:302025-12-12T19:50:38+5:30
Nagpur : महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता; असा थेट सवाल आज उद्धव ठाकरें यांनी राज्य सरकारला केला. विधीमंडळाच्या सभागृहातून परतल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

Do you want to keep Maharashtra united or do you want to break it into pieces? Uddhav Thackeray questions the government
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता; असा थेट सवाल आज उद्धव ठाकरें यांनी राज्य सरकारला केला. विधीमंडळाच्या सभागृहातून परतल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी रेटल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ही मागणी पूर्ण होऊच शकत नाही.
विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र विदर्भाचा आहे. हा महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालण्याचा विषय आहे. जो कुणी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करेल, तो महाराष्ट्राचा नाही, असे म्हणत ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता, हे सरकारने जाहिर करावे, असे आव्हान देणारा प्रश्न ठाकरे यांनी केला. विदर्भाची मागणी करणारांनी आतापर्यंत विदर्भाच्या प्रश्नांवर काय केले, ते आधी सांगावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज
शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय ३० जूनला घेणार असल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी हा मुहूर्त कशासाठी असा प्रश्न करून घाव बसला तेव्हाच उपचाराची गरज असते, असे म्हटले. कधी नव्हे तेवढी वाईट स्थिती शेतकऱ्यांची आहे, असे सांगून शेतकाऱ्यांना तात्काळ मदतीची गरजही ठाकरे यांनी विशद केली.
ते कोण होतात ?
विरोधी पक्षनेत्यासाठी भाजपाने वडेट्टीवार आणि परब यांच्या नावाची गुगली टाकल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता ठाकरे यांनी 'ते' (भाजपा) कोण होतात. कुणाचे नाव द्यायचे ते आम्ही ठरवू. या संबंधाने आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही सभागृहातील पदांसाठी विरोधकांनी दोन आमदारांच्या नावांची शिफारस केल्याची माहिती त्यांनी दिली.
नैतिकता आणि शिवराज पाटील
काँग्रेस नेते शिवराज पाटील यांचे निधन झाल्याचे कळाल्यामुळे पत्रपरिषद सुरू करण्यापूर्वीच ठाकरे यांनी दिवंगत पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ते राजकारणात असताना शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढत होते. तरीसुद्धा त्यांची एक चांगली गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे, असे म्हणत त्यांनी पाटील देशाचे गृहमंत्री असताना २६/११ चा हल्ला झाला. त्यावेळी नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. अलिकडे राजकारणात नैतिकता दिसत नसल्याचे ठाकरे म्हणाले.