हृदय उजवीकडे सरकले असल्यामुळे सैनिकपदासाठी अपात्र ठरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST2021-06-16T04:11:02+5:302021-06-16T04:11:02+5:30
नागपूर : हृदय उजवीकडे सरकले असल्यामुळे सैनिकपदी नियुक्तीसाठी अपात्र ठरवण्यात आल्यामुळे अजय तितिरमारे या तरुणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

हृदय उजवीकडे सरकले असल्यामुळे सैनिकपदासाठी अपात्र ठरवले
नागपूर : हृदय उजवीकडे सरकले असल्यामुळे सैनिकपदी नियुक्तीसाठी अपात्र ठरवण्यात आल्यामुळे अजय तितिरमारे या तरुणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाला नोटीस बजावून यावर २२ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. हृदय उजवीकडे सरकले असण्याच्या स्थितीला शास्त्रीय भाषेमध्ये ‘डेक्सट्रोकार्डिया ॲण्ड साइटस इनवर्सस’ म्हणतात. ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. असे हृदय असलेल्या व्यक्तीच्या शरीरिक क्षमतेवर काहीच परिणाम पडत नाही. अशी व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते. त्यामुळे सैनिकपदी नियुक्तीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय चुकीचा आहे, असे अजयचे म्हणणे आहे. न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाला या मुद्यावर स्पष्टीकरण मागितले आहे.
अजयला सैनिक व्हायचे असून त्यासाठी तो गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करीत आहे. यावेळी त्याने शारीरिक चाचण्या उत्तीर्ण केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी झाली. त्यात त्याचे हृदय उजवीकडे सरकले असल्याचे आढळून आले. परिणामी, त्याला अपात्र ठरविण्यात आले. परंतु, पुणे येथील ‘कमांड हॉस्पिटल’ने दिलेल्या वैद्यकीय अहवालात अजयला सैनिकपदी नियुक्तीसाठी अपात्र घोषित करण्यात आले नाही या मुद्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
--------------------
अमेरिकेने नियम बदलले
‘डेक्सट्रोकार्डिया ॲण्ड साइटस इनवर्सस’ असलेली व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते, ही बाब लक्षात घेता अमेरिकन सरकारने सैनिक भरती नियमात बदल करून अशा व्यक्तींना सैनिकपदी नियुक्तीसाठी पात्र ठरवले आहे. ही माहितीही न्यायालयाला देण्यात आली.