आईशी भांडण करताना टोकले, भावावर प्राणघातक हल्ला
By योगेश पांडे | Updated: December 13, 2023 22:15 IST2023-12-13T22:14:56+5:302023-12-13T22:15:17+5:30
पोलिसांनी आरोपी भारतला ताब्यात घेतले आहे.

आईशी भांडण करताना टोकले, भावावर प्राणघातक हल्ला
नागपूर: आईशी भांडण करताना टोकल्याने एका मद्यधुंद तरुणाने स्वत:च्या मोठ्या भावावरच जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी दुपारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत सुभेदार लेआऊटमध्ये घडली.
भारत रमेश बाहेकर (३२) असे जखमीचे नाव असून भूषण बाहेकर (३०) असे आरोपीचे नाव आहे. भारतला दारूचे व्यसन आहे. त्याच्याशी वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली आहे. तो त्याच्या आईवडिलांसोबत राहतो. दुपारी १ वाजता तो दारू पिऊन घरी पोहोचला. स्वयंपाक करण्यावरून भारतचे आईसोबत भांडण सुरू झाले. त्याने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. भूषणने त्याला फटकारले आणि आईशी भांडण न करण्याबाबत सुनावले. त्यामुळे भारत संतप्त झाला आणि भूषणशी बाचाबाची सुरू केली. त्याने भूषणला मारहाण करण्यास सुरुवात केली व वीट उचलून त्याच्या डोक्यात मारली. यात भूषण गंभीर जखमी झाला. लोकांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी नेले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच आरोपी भारतला ताब्यात घेतले आहे.