डीआयजी कृष्णकांत पांडे यांच्या कन्येने संपवलं जीवन, ‘एम्स’मध्ये घेत होती वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 05:53 IST2025-11-14T05:49:49+5:302025-11-14T05:53:08+5:30
Nagpur Crime News: ‘एम्स’मधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची ती मुलगी आहे. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

डीआयजी कृष्णकांत पांडे यांच्या कन्येने संपवलं जीवन, ‘एम्स’मध्ये घेत होती वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण
नागपूर - ‘एम्स’मधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची ती मुलगी आहे. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
समृद्धी कृष्णकांत पांडे (२५, मंजिरा अपार्टमेंट, शिव कैलास, मिहान) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती ‘एम्स’मध्ये त्वचारोग विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. मैत्रिणीसोबत ती संबंधित फ्लॅटमध्ये राहत होती. बुधवारी सकाळी तिची मैत्रीण ‘एम्स’मध्ये गेली. त्यावेळी समृद्धी घरी एकटीच होती. तिची मैत्रीण रात्री आठ वाजता घरी परत आली तेव्हा दरवाजा लॉक होता. तिने दरवाजा उघडला असता समृद्धी सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत होती.
याबाबत माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. समृद्धीचे वडील व कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. सोनेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अभ्यासात हुशार असूनही होती मोठ्या तणावाखाली
समृद्धी पांडे ही अभ्यासात हुशार होती. मात्र, काही दिवसांपासून ती तणावात होती. तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत तपास सुरू आहे. मात्र, अद्याप कारण समोर आलेले नाही.
‘एम्स’मधील विद्यार्थी तणावात का?
याअगोदर ‘एम्स’च्या वसतिगृहातील संकेत दाभाडे (२२, जिंतूर, परभणी) याने ऑगस्ट महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या विद्यार्थ्यांना नेमका कोणता तणाव होता, असा सवाल आता या आत्महत्यांमुळे उपस्थित होत आहे.